लवाद

बाप-लेक आज पुन्हा कडाक्यानं भांडलेत-
टोकदार अपशब्द घरभर सांडलेत..
मी सारं ऐकतेय, पाहतेय
त्याच्या डोळ्यांतले अश्रू - धुमसणारे
आणि ह्यांचे अबोल हुंदके
फक्त मलाच ऐकू येणारे...
..
दोन वादळांमधल्या अस्वस्थ शांततेत
जीव मुठीत घेऊन वावरतेय,
त्या क्षणाला टाळत-
जेव्हा मला बनावं लागेल
त्या दोघांतला लवाद ,
ज्याला नसते
स्वतःची कुठलीच दाद- फिर्याद
..
त्या दोघांची वकील, साक्षीदार
माफीचाही -
मीच असणार आहे
कुणी जिंको वा हरो, शेवटी
मीच हरणार आहे....