*************************************************
*************************************************
काही वर्षांपुर्वी मी माझ्या मुलाला-कबीरला राजस्तानांत चितोडगड दाखवायला घेऊन गेलो होतो....त्याच्या राणाप्रतापांबद्दलच्या अन माझ्या मीराबाईंबद्दलच्या उत्सुकतेपायी! जाऊन आल्यानंतरही"चित्तोडगड" काही पाठ सोडेना... तिथल्या आख्यायिका.. पद्मिनीचा जलमहाल.. मीरेच कृष्ण मंदीर..माझ देररात्रीपर्यंत जोहारकुंडावर थांबण.. (गाईड सवयीन इथे अजुनही रात्री चित्कार ऐकू येतात म्हणून सांगून गेलेला.. )......सगळ मनांत कुठेतरी जमून बसल होत...त्यानंतरच्या माझ्या मंथनातन बाहेर आल्या त्या या ओळी... चित्तोडगड नावाच्या महागाथेला अर्पण!!!!
**************************************************
**************************************************
राणासांगा ते राणाप्रतापापर्यंत सगळ्यांना वाढवलस.. धैर्य दिलस तू
यवनी आक्रमणांतले वार झेललेस अन राजपूतांचे प्रहार जोपासलेस तू
अन हे सगळ-सगळ चिरंतनासाठी तुझ्यात जतनही करून ठेवलयस तू
या सगळ्यांच्या बरोबर
तू मीरेलाही रंगवलस निरामय प्रेमभक्तीत
तूच पाहीलस स्वार्थहीन प्रेमाच ते रुप.. उज्जवलपणे
तू पदमिनीलाही दूरदेशातून आणलस.. सजवलसही
तूच तिचा जोहारही बघीतलास... असहायपणे
तूच तर हे सगळे सारीपाट मांडतांना रचलेस अन मोडतांना जपलेस
तूच तर ह्या गाण्यांना-विराण्यांना आदी ते अनंतापर्यंत जिवंत राखलेस
तूच तर साक्षीदार या सगळ्या प्रणयांचा अन प्रलयांचाही
तूच तर सुत्रधार या सगळ्या कहाण्यांचा अन जाणीवांचाही
तू हे सगळ घेऊन जे उभा आहेस शतकांपासून
त्याला माझ्यासारखे अर्धशिक्षीत इतिहास म्हणतात
डॉलर घेऊन फिरणारे पर्यटक झक्क्कास म्हणतात
काही अजाण... चेतक घोडाच कसा क्लास म्हणतात
अन तूझ्या वर जगणारे तुला रोजचा घास म्हणतात
या सगळ्यांना कस समजणार आहे
तू काय काय भोगलयस आयुष्यात ते
............... मग ते
आजच्या जाणीवांच्या पलीकडच राजपूतांच शौर्य अन अकाली हनन असो
की पदमिनीच शापीत लावण्य अन हजारो यामीनींच भीषण विटंबन असो
मीरेचा अघटीत अन अचंभीत करणारा प्रेमभक्तीचा न्यास असो
की तू अविचलपणे पाहीलेले राजपूतांचे उत्सव अन वनवास असो
हे सगळ एका कवितेत बसवण तस कठीणच रे....
म्हणूनच मी एक करीन.... माझ्या मुलाला मात्र सांगीन....
"तू" म्हणजे काही फक्त चेतक घोड्याचीच गोष्ट नाही....
लिहीलेला तो इतिहास अन जपलेल्या त्या अख्यायिका...
जमलच त्याला तर यांतला फरक हृदयाने करायला शिकवीन
मीरेच प्रेम की भक्ती.. पदमीनीचा जोहार सक्ती की मुक्ती
यात न जाता तू जपलेला त्यांचा वसा कसा मोठा ते शिकवीन
तूच सांग एक भोगवादी संस्कृतीचा पाईक आणखी काय करू श़कतो...
हां आणखी एक करू शकतो... तुला अगदी झुकून सलाम करू शकतो!!!!
*************************************************
*************************************************
गिरीश कुळकर्णी
सप्टेंबर २००९
( इतरत्र प्रकाशीत )