'बिब्लिओथेक नैस्युनेल द फ्रान्स' अर्थात...

                                    'बिब्लिओथेक नैस्युनेल द फ्रान्स'  अर्थात फ्रान्सचे राष्ट्रीय ग्रंथालय

     'बिब्लिओथेक नैस्युनेल द फ्रान्स' या नावाने फ्रान्सचे राष्ट्रीय ग्रंथालय ओळखले जाते. नाव विचित्र वाटते ते इतर देशातील लोकांना पण फ्रेंच भाषेशी परिचय झाल्यावर हेच कानांना गोड वाटते. 'बिब्लिओथेक' म्हणजे ग्रंथालय ('डिस्कोथेक' शब्दाशी सतत संबंध येणाऱ्यांच्या तोंडात हा शब्द सहज बसेल) आणि 'नैस्युनेल' म्हणजे राष्ट्रीय. इंग्रजी 'नॅशनल' शी साधर्म्य असल्याने अर्थ लक्षात येतो. 
     कोणत्याही ग्रंथालयाला जसा प्रदीर्घ इतिहास असतो तसा याही ग्रंथालयाला आहे. हे ग्रंथालय पॅरिसमध्ये असून फ्रान्समध्ये प्रकाशित होणारी महत्त्वाची सर्व पुस्तके या ग्रंथालयात दाखल केली जातात. ग्रंथालयाचे सध्याचे अध्यक्ष श्री. ब्रुनो रॅसिन आहेत.
     चाल्स पाचवा याने १३६८ मध्ये 'लूव्र' या ठिकाणी रायल ग्रंथालय स्थापन केले. चौदाव्या लुईच्या काळात ग्रंथालय चांगलेच भरभराटीला आले. १६९२ मध्ये ग्रंथालय जनतेसाठी खुले करण्यात आले. फ्रेंच राज्यक्रांतीच्या काळात या ग्रंथालयात सुमारे तीन लाख पुस्तके होती. विविध राजवटींमधून जात जात अखेर हे ग्रंथालय 'इम्पिरिअल नॅशनल लायब्ररी' या नावाने सुरु झाले व १८६८ पर्यंत ते फ्रान्समधील सर्वात मोठे ग्रंथालय ठरले. १४ जुलै १९८८ रोजी तेव्हाचे अध्यक्ष मितरां यांनी ग्रंथालयाच्या नव्या इमारतीची घोषणा केली. २० डिसेंबर १९९५ पासून ग्रंथालयाच्या भव्य इमारतीचे कामकाज सुरु झाले.
     ग्रंथालयात सुमारे ५००० ग्रीक हस्तलिखिते आहेत. आजघडीला या ग्रंथालयात सुमारे बारा लाख पुस्तके आहेत. १९९७ मध्ये डिजिटल लायब्ररी नागरिकांसाठी खुली करण्यात आली. या डिजिटल लायब्ररीचे नामकरण 'गॅलिका' असे करण्यात आले.  'फक्त' बावीस मजल्यांची ही इमारत इंग्रजी 'एल' आकाराची आहे. सीन नदीच्या काठावर वसलेले हे ग्रंथालय म्हणजे एखादी लहान इमारत नसून गगनचुंबी इमारत आहे. लहानशा खोलीत लायब्ररी बघण्याची सवय झालेले भारतीय डोळे या इमारतीच्या नुसत्या छायाचित्रानेच दिपून जातात. या बावीस मजल्यांमध्ये शेकड्याने माणसे काम करतात. प्रत्येक काम हे व्यवस्थित होते.
     ग्रंथालयाचे जालस्थळही माहितीपूर्ण आहे. स्थळावर खुली पुस्तकतालिका तर आहेच शिवाय ग्रंथालयाशी संबंधित सर्व विषयांवर भरपूर माहिती आहे. उदाहरणार्थ, गॅलिका ही द्विभाषिक लायब्ररी असून तीत उत्तर अमेरिकेत फ्रान्सचे अस्तित्व या विषयावर भर दिलेला आहे. या विषयावर पहिल्यापासून पुस्तके डिजीटाईज्ड स्वरूपात ठेवण्यात आलेली आहेत. ग्रंथालयातर्फे आयोजित करण्यात येत असलेल्या सर्व उपक्रमांची माहिती आहे. सभासदत्वाच्या माहितीसह छायांकनासारख्या सुविधेची माहिती आहे. परदेशी ग्रंथालयात हमखास आढळणाऱ्या रेकार्डिंग सुविधेची माहितीही आहे. 
      भारतीयांसाठी निराळ्या प्रकारच्या अभिमानाची गोष्ट म्हणजे रघू राय या नामांकित छायाचित्रकाराने या ग्रंथालयाला स्वतःच्या कलाकृतींचे प्रदर्शन भरविण्यास भाग पाडले. 
      या ग्रंथालयाचा केवळ पॅरिसकरांना नाही तर लाल चेहऱ्याच्या सर्व फ्रान्सकरांना अभिमान आहे.
- केदार पाटणकर