आठवणीतील बाग

लहानपणी आम्ही राहत होतो ती एक चाळ होती. चाळीत एक छोटीशी बाग होती. ती बाग लहान होती. त्यात फुलेझाडे होती, लतावेली होत्या. लहान लहान वृक्ष होते. पण सर्व बगीच्यात अप्रतिम बाग म्हणजे स्मृतीची बाग, कुठल्याही क्षणी, कुठल्याही ऋतूत फुललेली, जिचा गंध जिवनभर दरवळत राहतो.

चाळीतील दोन खोल्या म्हणजे आमचे वसतिस्थान. या दोन खोल्यासमोरच चाळीच्या मालकांची एक लहानशी बाग केलेली होती. या छोट्या जागेला कंपांऊंड घालून त्या जागेत बरीच फुलझाडे लावली होती. बागेच्या ईशान्य दिशेला कोपऱ्यात एक रातराणीचे झाड होते. रातराणीचा सुगंध तर औरच. बागेच्या कोपऱ्यात असलेले हे झाड आमच्या खोलीसमोरच असे. वाऱ्याच्या रात्रीच्या वेळी रातराणीचा मादक सुगंध संपूर्ण परिसर व्यापत असे. झाडाची फुले कधी फारशी तोडली गेली नाहीत. त्याची शोभा झाडावरच.

या छोट्याशा बागेत मधोमध एक पारिजातक होता. हा पारिजातक चमचमणाऱ्या पांढऱ्या फुलांनी भरलेला असायचा. तो पांढरा कुडता आणि केशरी सलवार घालून आला आहे असे वाटायचे. संध्याकाळ झाली की हळूहळू कळ्या उमलण्यास सुरवात होत असे आणि पहाटे पर्यंत त्याचे पूर्ण फुलात रुपांतर होऊन जरा सूर्यकिरण डोकावू लागले की ही नाजूक फुले धरतीचा आश्रय घेऊन जमिनीवर फुलांचा गालीचा पसरत असे. बागेतल्या अंगणात पारिजातकांच्या फुलांची रास नजरेला पडली की हळूवारपणे फुले वेचून त्यांचे भले मोठे हार गुंफून देवाला वाहण्या पर्यंतचा फुलांचा प्रवास अतिशय नाजूकपणे होत असे.

जाईजुई, मोगरा, चमेली, कुंद यांची जातच निराळी. त्याम्चे गजरे अलदगपणे चाळीतील मुलींच्या वेणीवर यायचे. कधीकधी अबोलीचा गजरा भाव खाऊन जायचा. बागेत तुळशीची रोपेही होती. एका कोपऱ्यात कण्हेरीचे झाड होते. त्याला भरपूर फुले यायची. कवठी चाफ्याची जादू काही निराळीच. त्यांचे पांढरा आणि पिवळा असे दोन रंग होते. सुरवातीला गर्द हिरव्या पानामधून फुलांच्या वासाच्या अनुषंगाने फुल शोधावे लागत असे. पण नंतर झाडावर अगणित फुले येत असत. हिरव्या चाफ्याला मात्र कमी फुले येत आणि त्याच वास जरा उग्र असतो. तो लांबूनच जास्त छान वाटतो. हिरव्या झाडामधून हिरवे फूल शोधणे म्हणजे भरपूर कसरत असायची. मी लहानपणी नवीन मराठी शाळेत जायचो. मराठी चौथीपर्यंत ती शाळा होती. शाळेत शिक्षक व शिक्षिका होत्या. मुले मुली एकत्र शिकत. आमच्या शाळेतल्या एका बाईंना हे हिरव्या चाफ्याचे फूल हवे असायचे.

आमच्या घरच्या देवाच्या पूजेला बाजारातील फुले विकत आणायची जरूरी भासली नाही. तुळस, फुले रोज मिळायची. अशा या बागेतल्या विविध फुलांनी माझे बाल्य आणि तारुण्य व्यापले होते. ही विविधरंगी, तेजस्वी फुलांची मेजवानी हे माझे मित्रच जणू. आता मागे वळून बघताना हे मित्र भेटत नाहीत. म्हणून नकळतच डोळ्यामध्ये अश्रूंची गर्दी होते आणि मन भूतकाळात पुन्हापुन्हा जाण्याचा प्रयत्न करते. वाटते की असेच आयुष्य मागे जाऊन पुन्हा चाळीतील बागेतल्या अंगणात जावे आणि रमावे.

_नारायण भु. भालेराव