ह्यासोबत
ही कथा आहे आठवणींतल्या एका प्रवासाची. प्रवास आहे कोईंबतूर आणि आसपास.
आम्ही म्हणजे मी आणि आमचे मित्र. यथावकाश एकेकाचा परिचय होईलच. एकाचे नाव जाड्या. हा या प्रवासात होता. खरे म्हणजे याच्यामुळेच आम्ही कॉलेज सोडून इतकी वर्षें झाली तरी अजून एकत्र येतो. याला बायकामुले नसाल्यामुळे हा सदैव मोकळा. विनोदबुद्धि अफाट. हजरजबाबी तसाच. कोणाची टोपी केव्हा कशी उडवेल याचा कांही नेम नाही. कितीहि वाईट पदार्थ भरपूर स्तुति करून तोंड जरादेखील वाकडे न करता कितीहि खाऊ शकतो. त्यामुळे हा आमच्या प्रत्येकी एक असलेल्या बायकांत हा फार लोकप्रिय. फोनवर बोलायला सुरुवात केल्याबरोबर सौ. गुदगुल्या झाल्याप्रमाणे ह्सू लागल्यास खुशाल समजावे की याच महाशयांचा फ़ोन आहे. वर्षाला पांचदहा पिकनिक्स व पाचसहा पार्ट्या असे किमान प्रमाण याने कायम ठेवले. १९९७ पासून वर्षाला पांचसहा पिकनिक्स असतात. हल्ली फोनाफोनीमुळे व मेलामेलीमुळे पार्ट्या कमीच. दोघेतिघे जमतात व इतरांशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून गप्पा होतात, सहलीचे बेत ठरतात आणि पक्केहि होतात. महाजालावरचीं गूगल टॉक, स्काईप इ. माध्यमें दिमतीला आहेतच. छोट्या गाडीतून आम्ही दीडदोन आठवड्यांच्या चारपांच सहली केल्या या सहलींच्या आठवणी सहलीवरून कालच आलो असे अजूनहि वाटतें. त्यापैकीं दुसर्या सहलीची ही कथा. पहिल्या सहलीच्या गंमतीजमती माझ्या जालनिशीवर pravaassudhirsange.blogspot.com या ठिकाणीं वाचतां येतील.
साल २००३. गणपतीचे दिवस. मस्त पाऊस पडून सृष्टी हिरवा शालू नेसलेली. मुंबईतल्या वातावरणांत गणेशोत्सवाचा उत्साह. अचानक जाड्याचा फोन. संध्याकाळीं बैठक आहे. आणि फोनवर नाहीं चालणार. प्रत्यक्ष भेटायचे आहे. मग काय? आलिया वारुणीशी असावे सादर. ठीक साडेसातच्या गोरज मुहूर्तावर जमलों. पाचेक मिनिटांत सहाहि जण उगवले. मागच्या, २००० सालच्या सफरीचे पांच यशस्वी कलाकार + चिन्या किरवंत. कोरम भरल्यावर देवानें जाहीर केलें. साताठ महिन्यांसाठीं कोईंबतूरला असाईनमेंट. मीं दोनचार दिवसांत जाणार.
दर महिन्या दोन महिन्यांनीं सहलीला जाणारें आमचें मित्रमंडळ. त्या सहलींना मुकावें लागणार म्हणून देवा थोडा खट्टू झाला होता. प्रवास आणि सहली म्हणजे त्याचा प्राणच. आम्हीं येऊं की एकदोनदां तुझ्याकडे. एकदोनदां तुझ्या घरची मंडळी येतील. एकदोनदां तुझी बहीण निर्मलताई वगैरे येतील. थोडक्यांत म्हणजे दर महिन्याला तुझ्याकडे इथलें कोणी ना कोणी असेलच. त्यांना फिरवून आणायचें काम तुझें. तिथलाहि ग्रूप जमेलच. कधीं वर्ष सरेल कळणार देखील नाहीं. इथल्यापेक्षां जास्त सहली होतील बघ. असें आम्हीं त्याला समजावलें.
आतां त्याच्या जिवांत जीव आला. पण माझी गाडी कुठें असणार तिथें? कंपनीची गाडी मिळेल तिथें. पण माझी गाडी कशी नाहीं, मीं जातांना गाडी घेऊनच जातों.
एकटा?
मग काय झालं?
हा माणूस खरेंच मामाकडे हुबळीपर्यंत एकटा गाडी चालवीत जात असे. मग आम्हीं पण येतों. शेवडे मास्तरांनिं विचारणा केली. कोण कोण येणार देवाकडे कोईंबतूरला? जातांना गाडीनें. तेव्हां त्याच्याकडे मारुती झेन गाडी होती. येतांना विमान किंवा रेलवे. मी, जाड्या, शेवडे तयार. देवा धरून चारजण झाले. नार्या सुरुवातीला तरी ठाम नाहीं म्हणाला. चिन्या आकारानें मोठा असल्यामुळें पांचवा म्हणून त्याच गाडींत मावणें शक्य नाहीं. म्हणून तो बाद तरी किंवा दोन गाड्या कराव्या लागणार.
पण राहाणार कुठे? देवानें विचारलें.
हॉटेलांत.
थोडें थांबलांत तर मला घर मिळेल कीं कंपनीतर्फे. फक्त तें पसंत करायला एकदोन आठवडे लागतील. हॉटेलचा खर्च कशाला?
ठीक आहे. आमची कांहींच हरकत नाहीं.
मग असें करतों. आतां मीं फ्लाईट घेतों. मनासारखें घर बघतों. घर मिळालें कीं मग तुम्हीं तिघे गाडी घेऊन या. तोपर्यंत पाऊस पण कमी होईल. आतां श्रावणाची अखेर आहे. घर मिळेपर्यंत दोनतीन आठवडे, नंतर एकदोन आठवडे तुमच्या तयारीला. बरोब्बर नवरात्र उजाडेल निघेपर्यंत. म्हणजे मागल्या दक्षिण सफरीसारखी मस्त सफर होईल. एकमतानें ठरलें. आफ्टर ऑल, ऑऽऽल ग्रेट मेन थिंक अलाऽऽईक.
देवा अगोदर गेलेला असल्यामुळें गाडी मास्तरच एकटा चालवणार त्यामुळें तो येणारच. जाड्याला मीं तरी गृहीतच धरलें होते. निघायचा मुहूर्त अर्थातच बहुतेक नवरात्राचा पहिला दिवस. तीन सदस्य नक्की झाले. गाडी घेऊन जायचें. येतांना भारतीय रेल. निघण्यापूर्वींच येतांनाची तिकिटें काढून ठेवायचीं. त्यामुळें तिकिटें त्वरित काढायचीं आहेत. तेव्हां नांवें दोन दिवसांत नक्की करा. टू - थ्री टायर ए. सी. ची तिकिटें नंतर मिळत नाहींत. मग ऑक्टोबरच्या उन्हाळ्यांतून सामान्य डब्यातून यावें लागेल. कोईंबतूर एक्सप्रेसच बरी पडेल. मुंबईत किंचित गैरसोय आहे. कुर्ला लोकमान्य टिळक टर्मिनसहून येतेजाते म्हणून. आतां कोण कोण शेपूट घालतो पाहायचें होतें. मी नंतर कळवतो - नार्या. मीहि नंतर कळवतो. - चिन्या. बघा! कोईंबतूर मध्यवर्ति ठिकाण आहे. तिथून उत्तरेला उटी, बंगलोर आणि म्हैसूर. पूर्वेला कोडाईकनाल, पश्चिमेला मुन्नार अहे. मुन्नार मागच्या वेळीं तिथें पोहोचूनहि पावसामुळें पाहायचें राहिलेंच होते. दक्षिण पश्चिमेला बॅकवॉटर्स. राहायला कोईंबतूरला फुकट. किंबहुना त्याला व्यवस्थित घर मिळेपर्यंत गाडी नेऊन द्यायचीच नाहीं. पाहा, अशी संधि येणार नाहीं. कोईंबतूरला शाकाहारी जेवण चांगलें मिळतें. कोईंबतूरचें लोणीहि प्रसिद्ध आहे कीं. - मीं.
"आपल्याकडे जसें मालवणी पदार्थ प्रसिद्ध आहेत - खासकरून मांसाहारी, तसे तिथें ‘चेट्टीनाड’ पदार्थ प्रसिद्ध आहेत." मास्तरांनीं पण फोडणी दिली, "तेव्हां अभक्ष्य भक्षणाची पण नामी सोय आहे. तेव्हां त्वरा करा व होकार कळवा. नार्या चिन्या दोघेहि आले तर नार्याची किंवा चिन्याची पण गाडी काढूं. दोन गाड्या करूं. येतांना चिन्याच्या गाडीतून पांचजण येऊं."
तिघांनीं २७ सप्टेंबर २००३ पासून सुट्या टाकल्या, नार्याचिन्यांनी नाहीं जमणार म्हणून कळवलें. साहाजिकच येतांनाचें ९ ऑक्टोबरचें तिघांचें रेलवेचें बुकिंग सांगितलें. देवा कोईंबतूरला निघून गेला.
क्रमशः