जरी आज ती राज्यभाषा नसे.

मराठीला राज्यभाषेचा दर्जा नसल्याने तिची पीछेहाट झाली असे म्हणण्यात येते, मात्र म. टा. मधले हे लेखन वाचल्यावर जरा बरे वाटले. अगदीच हताश होण्याइतके काही आमच्या मायबोलीचे भवितव्य काळवंडलेले नाही असे थोडेसे आशादायक चित्र मनांत तयार झाले. ह्याचा उहापोह मराठीतून करता यावा, ह्या उद्देशाने हे लेखन येथे उतरवून ठेवले आहे.


मूळ लेख : मराठी भाषेचे धडे
(महाराष्ट्र टाईम्स २२ सप्टें. २००४ सायं ६:४४:५९)


जनरेशननेक्स्टच्या जमान्यात मराठी भाषेला फार कमी महत्त्व दिलं जातं. पण दैनंदिन वापरासाठीच नाहीतर व्यावहारिक क्षेत्रातही मराठी भाषेची गरज भासते. अर्ज, अहवाल, पत्रकं, पत्रव्यवहार इत्यादी प्रशासकीय कामकाजासाठी मराठीची गरज लागते. याशिवाय जाहिराती, निविदा, जाहीर निवेदनं, इत्यादी प्रसार माध्यमांच्या कामकाजासाठी रूढ झालेली आणि रूळलेली मराठी भाषेची लेखनसरणी माहीत असणं आवश्यक आहे. त्याबरोबरच सारांश काढता येणं, लहान मोठे लेख तयार करणं आणि आवश्यकतेनुसार इतर भाषेतील लेखन भाषांतरित करणं याचीही आवश्यकता लागते. पण काही वेळेला सर्रासपणे चुकीचं मराठी लिहिताना आणि बोलताना आढळून येतं. आपल्या भाषेतील या चुका टाळून तिचा मान राखणं आपल्याच हाती आहे. ही गरज ओळखून डॉ. लीला गोविलकर आणि डॉ. जयश्री पाटणकर यांनी व्यावहारिक मराठी हे पुस्तक बाजारात आणलं आहे.


स्नेहवर्धन पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केलेलं हे पुस्तक पुणे युनिव्हसिर्टीने एफवायबीकॉम आणि एसवायबीएस्सी साठी क्रमिक पुस्तक म्हणून नेमलं आहे. केवळ विद्यार्थ्यांसाठीच नाहीतर सर्वांनाच उपयुक्त असं हे पुस्तक आहे. व्यावहारिक मराठी भाषेच्या योग्य वापराचे धडे या पुस्तकात दिले आहेत. निबंधलेखन, प्रशासनिक मराठी, सारांशलेखन आणि भाषांतर अशा सर्वच मुद्द्यांवर पुस्तकात दृष्टिक्षेप टाकण्यात आला आहे.


निबंधलेखनाची आवश्यकता, वेगवेगळे प्रकार, तंत्र, फायदे, घटक आणि गुणविशेष याबद्दलची माहिती निबंधलेखन या पहिल्या भागात आहे. प्रशासनिक मराठी या दुसर्‍या भागात कार्यालयीन टिप्पणीलेखन, घोषणापत्रक, निविदा, माहितीपत्रक अशा प्रशासकीय कामकाजाची माहिती देण्यात आली आहे. तिसर्‍या भागात जाहिरातलेखन आणि जाहीर निवेदन तर चौथ्या भागात सारांशलेखन कसं करायचं याचं मार्गदर्शन करण्यात आलं आहे. शेवटच्या पाचव्या भागात भाषांतर म्हणजे काय, त्याची गरज, महत्त्व, फायदे, तंत्र आणि त्यातील अडचणी यांची माहिती देण्यात आलेली आहे. या पाचही भागांचं अगदी व्यवस्थित आणि विस्तृत असं विश्लेषण लीला गोविलकर आणि जयश्री पाटणकर यांनी केलं आहे.


व्यावहारिक मराठीचं क्षेत्र व्यापक आहे. मराठीचा वापर कसा करावा, तंत्रशुद्धलेखन कसं करावं याचं मार्गदर्शन करणारं हे पुस्तक अगदी वाजवी किमतीत बाजारात उपलब्ध आहे. मात्र हे पुस्तक वाचून भाषाशैली विकसित करणं तुमच्या इच्छेवर अवलंबून आहे!