मला काय हवे याचा विचार कोण करते;
स्वप्न माझेच वेडे रात्रीस का या बोचते.
इतके हे भोगणे जमले मला कसे;
जगणे माझेच जेव्हा पायवाट सोडते.
चालण्याचीच मला आता भीती वाटते;
नेहमीचीच वाट मला वेगळी का भासते.
जगणे माझे कसे हे भावनेला भाळते;
एकटे पडणे माझे का आपलेसे वाटते.
डोळ्यातल्या खुणांचे अर्थ मी का लावले;
आसवांचेही माझ्या का हे बाजार मांडले.
भोवताली जरी फुलले फुलांचे ताटवे;
पाय माझे तरीही मी का बांधून घातले.
चालताना माझे अचानक असे हे थांबणे;
गंध नसल्या फुलांचे का पुन्हापुन्हा माळणे.