जैव उत्क्रांतीची ओळख (अंधारातील अक्षरे - भाग ४)

     माणूस कसा जन्माला आला, या प्रश्नाने सुरु झालेला खल एकंदर जीवसृष्टी कशी जन्माला आली, इथपर्यंत येतो. वर्षानुवर्षे मंथन सुरु आहे. 

    या विषयावर मराठी वृत्तपत्रांतूनही वेळोवेळी लेखन प्रसिध्द होत असते. ते तात्कालिक स्वरुपाचे असते. पुस्तकाचे स्वरुप त्यांना नसते. या विषयावर पुस्तकेही मर्यादित आहेत. मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषांमधून जे ग्रंथ आहेत ते बोजड तर आहेतच परंतु विषयाचा वेध सामान्य वाचकाच्या बुध्दीची परीक्षा घेणारा असतो.
    पु.के. चितळे यांचे 'जैव उत्क्रांचीची ओळख' हे पुस्तक या दोन्ही बाबींना फाटा देत सुबकपणे प्रकाशित झाले आहे. अत्यंत सोप्या भाषेत लिहिलेले हे पुस्तक दहावी उत्तीर्ण झालेल्या मेंदूलाही जड वाटणार नाही. जैवसृष्टीचा उदय कसा झाला?, लिंगस्पर्धा?, टाकाऊ अवयवांचा सदुपयोग?, निसर्गाचे अस्तित्व कुणामुळे? ही काही प्रकरणांची नावे आहेत. वाचतना कंटाळा येऊ नये, याची पुरेपूर दक्षता श्री.चितळे यांनी घेतली आहे. आवश्यक तेथे रेखाचित्रांनी संकल्पना स्पष्ट करुन दिलेल्या आहेत.
   चिंपँझी माकडाचे माणसाशी असलेले नाते एकदम पटावे, अशा पध्दतीने सांगण्यात आलेले आहे. सामन माशाची मादी प्रत्येक मोसमात बारा हजार अंडी घालते, अशासारखी माहिती तर पुस्तकात पुष्कळ आहे. मनुष्य, प्राणी व पक्षी यांच्या निर्मितीच्या शक्यता लेखक दाखवतो, आपापसातील संबंध उलगडून दाखवितो. या विषयाचा संस्कृती, भूगोल व इतिहासाशी कसा संबंध आहे हे लेखनातून स्पष्ट होत जाते. पृथ्वीवरील सध्याचे खंड अनेक कोटी वर्षांपूर्वी एकमेकांना कसे जोडलेले होते, हे कळून घेणे केवळ आनंदाचा भाग आहे.
   पुणे येथील सन पब्लिकेशन्सने पुस्तक प्रकाशित केले असून किंमत केवळ पंचाहत्तर रुपये आहे. सन पब्लिकेशन्सचा पत्ता असाः
   ३१७, नारायण पेठ, दै.प्रभातसमोर, पुणे-४११०३० 
   दूरध्वनीः ०२०-२४४५९५४१