दिवसभर उडवलेला मोठमोठ्या गप्पांचा धुरळा खाली बसू लागतो
इथेतिथे खरडलेल्या चमकदार शब्दांचे दिवेही मालवू लागतात
शोधून सापडत नाही सावलीही
आणि मग हळुहळू...
माझ्या अस्तित्वाच्या विश्वाचा पसारा आ वासून उभा राहतो माझ्यापुढे!
त्यातल्या टिकलीएवढ्या तेजाआड लपून मी दिवसभर टाळला होता जो -
त्या मिडिओक्रिटीच्या मंद चांदण्याचा प्रपात सताड उघड्या डोळ्यांमध्ये गुदमरतो
आणि ओघळतो... माझ्या अस्तित्वाचा सारांश
पुन्हा सुरू होते त्या टिकलीएवढ्या तेजासाठी माझी युगांची प्रतीक्षा!