मुंबईतील हॉटेलमधील नवीन नियम

मुंबईतील हॉटेल संघटनेने लागू केलेल्या नव्या नियमापासून ताटात घेतलेले अन्न  टाकल्यास पाच रू. दंड आकारण्यात येणार आहे. वाढती महागाई व अन्न धान्याची कमतरता हे मुख्य कारण असल्याचे सांगत आहेत. तसेच ग्लासातील वाढलेल्या पाण्याचाही अपव्यव टा़ळण्यात येणार आहे. (स्टार माझावरील बातमी येथे वाचा. व्हिडीयोचा नेमका दुवा  मिळाला नाही. स्टार माझाच्या संकेतस्थळावर येथे ११/१२/२००९  च्या यादीमध्ये "खाऊन माजा टाकून नको!" व्हिडीयो पहायला मिळेल. तसेच मटावरील बातमी येथे वाचा)

मनात विचार आला की हे आधीपासून त्यांच्या लक्षात का येत नव्हते? असो, उशीरा का होईना लोकांना जाग येत आहे. मी तर गेले कमीत कमी ६/७ वर्षे हा नियम स्वत: पाळत आहे. ताटात घेतलेले अन्न पूर्ण संपवितोच. तसेच सोबत असलेले नातेवाईक किंवा मित्र ह्यांनाही करावयास सांगतो. खरोखरच खाऊन होत नसेल तर ते पाकिटात बांधून देण्यास सांगतो.

पाण्याचेही तसेच. तसा मी कमीच पाणी पितो(जास्त प्यावयास पाहिजे हे मान्य. सध्या तरी तो मुद्दा नाही) आणि पाहिजे तेवढेच पाणी घेतो. पण ग्लास रिकामा झाला असेल आणि पुढील वेळी जर कोणी ग्लासात पाणी वाढून देत असेल तर मला पाहिजे तेवढेच वाढायला सांगतो. काही वर्षांपूर्वी हॉटेलात पाहिले होते की, अर्धा ग्लास रिकामा असला तरी वेटर तो ग्लास उचलून त्याच्या जागी पूर्ण भरलेला ग्लास ठेवत असे. मला ते पटले नव्हतेच. मित्रासोबत बोललो, तर तो म्हणाला, "काही हॉटेलमध्ये पद्धत असते. चांगली सेवा द्यायची म्हणून वाढताना पाणी सांडण्याची शक्यता असल्याने  ग्लासच बदलवून द्यायचा." म्हटले ठीक आहे. तेव्हा काही म्हणालो  नाही.  पण आता ह्या हॉटेलवाल्यांनीही ग्लास बदलण्याची पद्धत बंद करावयाचे ठरविले आहे असे ऐकून चांगले वाटले.

तसेच फक्त हॉटेलच्या ग्राहकांनाच पाणी देण्यात येणार असून फु़कटात देण्यात येणारे पाणी बंद करणार आहेत. अर्थात त्यांना पडणारा पाण्याचा खर्चही ते कमी करू इच्छित असतील. तरीही पाण्यासारखी गरजेची गोष्ट नाकारणेही तेवढे चांगले वाटत नाही. पण प्रत्येकाचे मत वेगळे म्हणता येईल.

सध्याचा नियम म्हणजे दंड म्हणून नाही पण जनजागृती व्हावी ह्यासाठी असे पाऊल उचलले गेले असा त्यांचे म्हणणे आहे. आता जरी ग्राहकांचा त्यात सकारात्मक प्रतिसाद असला तरी किती दिवस चांगला सहभाग मिळेल? तो सारखा मिळून हॉटेलला असा नियम बनविणे गरजेचे वाटणार नाही अशीच इच्छा आहे.
पण काही हॉटेलमध्ये ताटातील, मागवलेल्या पदार्थांतील उरलेले पदार्थ  बांधून देण्यास नकार करतात. अशा वेळी काय करणार?

अशाच प्रकारे विजेचा होणारा अपव्यव टाळण्यातही लोकांनी पुढाकार घेतला तर आणखी चांगले होईल असे वाटते.