मनात दडलेल्या कविता

कवितांचे आणि आपले नातं तसं अगदी घट्ट.. लहानपणी आईच्या कडेवर बसून एक घास काऊचा आपल्या पोटात जातो, तो या कवितेच्या सोबतीनं.. अडगुल-मडगुल गुणगुणणाऱ्या आईच्या तोंडाकडे बाळही कसं टकमक बघत राहतं.. ही कवितेची ओढ नाहीतर काय?. अनेक पावसाळे पाहिलेत असा दाखला देणारे आपण आयुष्यातील पहिल्या पावसाचं स्वागत येरे येरे पावसा असं गुणगुणत करतोच ना! बडबड गाणी, बालगीतं मोठमोठ्यानं म्हटल्या शिवाय अक्षरांशी गट्टी कुणाची जमली का?.
कविता आपण शिकतो, जगतो ते शाळेत.. तरुणपणात ज्याला एकतरी कविता सुचलेली नाही असा माणूस सापडणे कठिण. शाळेत शिकलेल्या कविता आयुष्यभर आपली साथ सोडत नाहीत. कधितरी गप्पांच्या ओघात ही कविता आम्हाला होती असं म्हणत आपण कविता चटकन म्हणूनही टाकतो. आजी-आजोबा, अगदी आई-बाबा आणि वेळ पडली तर आपणही शाळेत शिकलेल्या कविता पाठ केल्यासारख्या म्हणतो. काही कविता काळाच्या पडद्याआड जातात पण विस्मृतीत जात नाहीत. अचानक त्या आठवतात नाहीतर आपण आठविण्याचा प्रयत्न तरी करतोच. या कवितांमध्ये असं काय असतं की त्या आपल्याला इतक्या बिलगलेल्या असतात. परवा आमच्या घरात एक फुलपांखरू आलं अतिशय सुंदर फुलपांखरू होतं ते, त्याला पाहाता-पाहाता माझ्या तोंडून सहज शब्द बाहेर पडले. छान! आणि मला लहानपणाची ती कविता आठवली
 फुलपांखरू I
छान किती दिसते I  फुलपांखरू I
या वेलीवर I फूलांबरोबर
गोड किती हसते I फुलपांखरू I
पंख चिमुकले I निळे जांभळे
हालवूनी झुलते I फुलपांखरू I
डोळे बारिक I करिती लुकलुक
गोलमणी जणू ते I फुलपांखरू I
मी घर जाता I येइ न हाता
दूरच ते उडते  I फुलपांखरू I
तुम्हाला आठ्वतात का अशा काही कविता.. या निमित्ताने त्या आठवू. इतरंना सांगू. कुणी विसरले असेल तर त्याला या माध्यमातून त्या कवितेजवळ नेऊ. आजीच्या जवळचे घड्याळ असेल नाहीतर लाडकी बाहुली असेल. कुणाला काहितरी सापडेलच की.
.....................................................................................................