(गमक)

प्रेरणास्रोत : मिल्या यांची गझल "गमक"

कसे जगावे सुखात ह्याचे मला कळाले अता गमक
इथे तिथे शोधणे कशाला? हवी कुणी ठेंगणी सुबक

खरोखरी छंदमुक्त लिहिणे सदैव जर का तुला हवे
मना सुचे ते लिही अगोचर, कशास जुळवायचे यमक?

लगेच ढुसतील कोपरांनी वयात येताच तू जरा
टिकायचे तर निदान सँडल तरी असावी तुझी टणक

उगाच नामोनिशाण जैसे कशास अल्फ़ाज़ घ्यायचे?
कशास सोडायचे मराठीवरी असा रीतिने उदक?

पडेल हे उन्मळून माझे क्षणात बेजार टाळके
तुझ्या बडबडीमुळे अशी डोचक्यात जाईल ही सणक

उगाच व्रतभंग व्हायचा जर दिलीस उत्स्फूर्त चुंबने
कशास तव चेहर्‍यास इतके दिसायला पाहिजे कडक?

खलास केलेस तू कवींना... दिला न सोडून एकही
सुचायला ही विडंबने, लेखणीत, खोड्या, हवी चमक