या सदनिकेत माझ्या

राहुल उवाच:

राजास ती अनोखी, सुखे न जी मिळाली
ती सर्व प्राप्त झाली, या सदनिकेत माझ्या ||१||

कोचावरी पडावे, टीव्ही कडे पाहावे
प्रभुनाम वर्ज्य आहे, या सदनिकेत माझ्या ||२||

पहारे आणि तिजोर्या, त्यातुनी होती चोर्या
दारास latch आहे, या सदनिकेत माझ्या ||३||

माझ्याच माउलीला, मज्जाव शब्द आला
सत्तांध धर्मपत्नी, या सदनिकेत माझ्या ||४||

बुडाशी माउ बिछाने, विदेशी पायताणे
जिणेच लाजिरवाणे, या सदनिकेत माझ्या ||५||

येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा
आम्हावरी च बोजा, या सदनिकेत माझ्या ||६||

पाहून क्लैब्यं माझे, शिखंडी तोही लाजे
भ्रांती सदा विराजे, या सदनिकेत माझ्या ||७||


संत तुकडोजी महाराज यांनी अनेक कविता लिहील्या. त्यातीलच ही एक -

राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली
ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या॥१॥

भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पाहावे
प्रभुनाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या॥२॥

पहारे आणि तिजोऱ्या, त्यातूनी होती चोऱ्या
दारास नाही दोऱ्या, या झोपडीत माझ्या॥३॥

जाता तया महाला, ‘मज्जाव’ शब्द आला
भीतीनं यावयाला, या झोपडीत माझ्या॥४॥

महाली माऊ बिछाने, कंदील शामदाने
आम्हा जमीन माने, या झोपडीत माझ्या॥५॥

येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा
कोणावरी न बोजा, या झोपडीत माझ्या॥६॥

पाहून सौख्यं माझे, देवेंद्र तोही लाजे
शांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या॥७॥