शेतकऱ्याचा मुलगा म्हणाला
वेगळं काहीतरी करायचंय
मी तर बिझनेस करणार
चिखलात नाही सडायचंय
त्या बिझनेसमनचा मुलगा म्हणाला
वेगळं काहीतरी करायचंय
मी आयटी इंजिनीयर होणार
टेन्शनमध्ये नाही जगायचंय
त्या इंजिनीयरचा मुलगा म्हणाला
वेगळं काहीतरी करायचंय
एमबीए करणार, एक्झिक्युटीव्ह होणार
टेक्नॉलॉजीत नाही अडकायचंय
त्या एक्झिक्युटीव्हचा मुलगा म्हणाला
वेगळं काहीतरी करायचंय
शेतात राबणार, अन्नदाता होणार
देशाला स्वयंपूर्ण बनवायचंय