बघता बघता एक वर्ष संपलं..
दिवस संपून गेले आता फक्त सरलेल्या क्षणांच्या पाऊलखुणा
एक आवर्तन पूर्ण झाल्याची भावना आणि नावीन्याची ओढ, मनाला अस्वस्थ करणारी...
ती ओढ पूर्वीही होती त्याची आता फक्त हुरहुर झाली कारण,
एक वर्ष संपलं...
किती क्षण आले आणि किती गेले याची गणतीच नाही
आता मोजदाद करून काहीही उपयोग नाही
क्षण हे मोजण्यासाठी नव्हे तर भोगण्यासाठी असतात
काही क्षण उपभोगले तर काहींना जपून ठेवायचं राहून गेलं
एक वर्ष संपलं...
इतका मोठा अवधी म्हणजे एक प्रवाह आहे
आणि या प्रवाहाच्या विरुद्ध जाणे कोणालाच जमले नाही
अनेक जण यात सामील झाले, सोडूनही गेले
येणाऱ्यांचं हसत हसत स्वागत झालं पण जाणाऱ्यांचा निरोप घेणं राहूनच गेलं
एक वर्ष संपलं...
या वाटचालीत अनेक अनुभव आले
कित्येक सुखद पायघड्या तर काही तप्त निखारे
मखमलीचा आनंद अपार लुटला
थोडंसं दुःख व्यक्त करायचं राहून गेलं
एक वर्ष संपलं...
झाले गेले गंगेला मिळाले
इथे थांबून चालत नाही
नावीन्याची साद कानी रुंजी घालत आहे
सृजनाची पाउले वाट चालीत आहेत
मागील वर्ष सुद्धा जाता जाता अखंड समाधान देऊन गेलं
पंखात भरारीचे बळ देऊन गेलं
बघता बघता एक वर्ष संपून गेलं..