तुझ्यात आणि जगात मला,
रोज एक अप्रत्यक्ष स्पर्धा भासते
मला जिंकण्यासाठी
एकीकडे जग साम, दाम, दंड, भेद
सर्वकाही वापरून नवं-नवीन डाव रचत.
कधी समजावत,
कधी धमकावत,
कधी प्रलोभन दाखवत
तर कधी मनात संशयकल्लोळ माजवत
दिवसभर या सगळ्याचा सामना करून, थकून
रात्रीच्या चांदण्यात मी तुझ्याकडे बघतो,
तू फक्त मंद हसतेस,
आणि मी तुझाच होऊन राहतो