परिनिर्वाण...

हवेच्या झुळुकेवर लहरणारी शेतं
डौलात उभी डेरेदार झाडं
आदिदेवाचं ओंकाररूप
पुरातन मंदिरात साकारलेलं
ओंकाराच्याच वळणानं
नदीचं पाणी झुळझुळतं

अंवतीभंवती विखुरलेली वस्ती
गुण्यागोविंदानं नांदणारी
हवेला गोडा गारवा अन्
मीठभाकरी काटक होती

ढळत्या रातीची नीरवता
भैरवीनं सुखावणारी
रामप्रहरीची भूपाळी
चैतन्य जागवित होती

लहरी दरबारी ठरावानं
गांवाला दिला दर्जा
पर्यटनविकास झपाट्यानं करणार
पिटला असा डांगोरा

झालं !
जिथं मातीतून सोनं पिकत होतं
त्या जननीला विकलं गेलं
सोन्याच्या दामानं, पण...
विचार कोण करतंय्
सोन्यातून कधी हंसत नाही रे
या भूमीतला हिरवा राम ॥