शोध आनंदाचा....

एकदा एक माणूस मला रस्त्यात भेटला
कपाळाला आठ्या घालत मला म्हणाला,
"मला एक गोष्ट कळत नाही
आनंद कुठे विकत मिळत नाही"
त्याला पाहून मी फक्त हसलो
त्याला की प्रश्नाला हे त्याला कळलंच नाही
विकत घेऊ पाहणाऱ्याला आनंद कसा समजावणार
हे माझे मलाच वळले नाही
मी त्याला म्हणालो,
"कधी तरी स्वतःला आरशात पाहून बघ
प्रतिबिंब पाहून स्मितहास्य देऊन बघ
त्याचे मनात सापडलेले बिंब म्हणजेच आनंद!
कधी खिडकीबाहेर डोकावून पाहा
एखादं लहान मूल खेळत असेल
हात पुढे कर तुझ्या कुशीत येऊन बसेल
त्या कुशीतील ऊबदार निरागसता म्हणजेच आनंद!
आयुष्यात एकदा तरी परीक्षा दिली असशील
जीव वर खाली झाल्यानंतर उत्तीर्ण झाला असशील
ती ताणली गेलेली उत्सुकता म्हणजेच आनंद!
रोज गर्दीने भरलेली लोकल पकडत असशील
ब्रिजवरून धावपळ करत दरवाज्यात उडी मारली असशील
चढल्यावर टाकलेला निःश्वास म्हणजेच आनंद!
एखादी मुलगी तुला कधी तरी नक्कीच आवडली असेल
तिला समोर पाहून गालावर खळी फुलली असेल
तेव्हा तुझ्या मनात उमललेला गुलाब म्हणजेच आनंद!
मंदिरात तर तू नेहमी जातोसच पण हे करून बघ
पायरीशी बसणाऱ्या असहाय्याला दान करून बघ
त्यावेळी मिळालेले आकंठ समाधान म्हणजेच आनंद!"
इतकं सारं बोलून झाल्यावर तो मान हलवत निघून गेला
पण त्याला समजावताना झालेली स्वानुभूती म्हणजेच आनंद!
- आनंदयात्री