'अक्षर'रान

गर्द केवढे, फुलले, सजले
सदाबहार हे 'अक्षर'रान
या रानातील माझा हिस्सा
म्हणजे केवळ एकच पान

थोर वृक्ष हे रानामधले
काय वर्णू मी त्यांचा मान
वाराही या रानातून जाताना
म्हणतो माझे भाग्य महान

महावृक्ष हे, कल्पवृक्ष हे
काय सांगू मी त्यांची महती
सूर्यकिरणही जेव्हा पडती
चरण तयांचे सत्वर धरती

फळे, फुले वा सुगंधी काष्ठे
जे जे या रानातून मिळते
भरत राहते झोळी सुखाची
जीवन अवघे पुलकित करते

अमृतासमान भासे मजला
हा अमुचा शतकांचा ठेवा
या रानाला 'पान' अर्पितो
भाग्यही करते माझा हेवा