वैश्विक व्याकरण

२० व्या शतकामध्ये तत्वज्ञानाच्या ज्या शाखांत अतिशय मूलगामी अभ्यास झाला त्यातली एक म्हणजे भाषा-तत्वज्ञान - फिलॉसॉफी ऑफ लँग्वेज. या शाखेच्या अनेक उपशाखा आहेत. प्रत्येक उपशाखेचा एक मध्यवर्ती प्र्श्न (किंवा प्रश्नसंच) आहे. उदा.
भाषा (एक संकल्पना म्हणून) म्हणजे काय? तिचे प्रयोजन काय? तिचे स्वरूप काय?
कुठलीही एक विशिष्ट "भाषा" म्हणजे काय? उदा. "मराठी" मराठीच कशामुळे ठरते? तिचा एखादा घटक हा मराठीचाच घटक कसा ठरतो, गुजरातीचा का नाही?
भाषेचे लघुत्तम अर्थपूर्ण रूप काय? शब्द, वाक्य, संपूर्ण क्षेत्र-संज्ञावली (डोमेन ऑंटॉलॉगी) की अक्खी भाषा?
भाषा आणि "अर्थ" यातला संबंध काय?
भाषा आणि भान (कॉन्शसनेस) यांचा संबंध काय?
योग्य भाषांतराचे निकष कोणते?
इ. इ...
असाच एक मूलभूत प्रश्न म्हणजे - आपण भाषा कशी शिकतो? काही तज्ञांच्या मते हा भाषा-तत्वज्ञानाचा विषय नसून भाषा-शास्त्राचा (लिंग्विस्टिक) विषय आहे. पण हा तांत्रिक मुद्दा या लेखापुरता बाजूला ठेवला तरी चालेल.

थोडक्यात पार्श्वभूमी:
पाश्चात्य तत्वज्ञानात भाषा-विचाराची सुरुवात तत्वज्ञानाच्या "राजकुमाराने" - अॅरिस्टॉटलने केली असं म्हणता येईल. त्याने तर्कशास्त्राचा पाया घातला. भाषा आणि अर्थ यासाठी एक सुसूत्र साचा मांडला. पण त्यानंतरची कित्येक शतके भाषाविचार पुढे सरकला नाही. विश्वाचे स्वरूप आणि ते स्वरूप जाणून घेण्याची माणसाचे क्षमता यामध्ये "भाषा" एक प्रकारे गृहीत धरली गेली. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात सोरेन कर्कगार्ड या तत्वज्ञाने भाषेला तत्वज्ञाच्या क्षेत्रात केंद्रस्थानी घेऊन येण्याची गरज आहे असे मत मांदले. २० वं शतक सुरू झालं आणि भाषेचं तत्वज्ञानातलं महत्व वाढायला लागलं. डि सॉसर याने आधुनिक भाषा-शास्त्राचा पाया घातला. फ्रेगे आणि रसेल यांनी भाषा-तत्वज्ञानाची मीमांसक पद्धती सुरू केली. अर्थ म्हणजे काय किंवा भाषेला अर्थ कसा लाभतो याबद्दलचे गणितीय तर्कशास्त्र मांडले. पुढे टार्स्की आणि विटेंन्ष्टाईन यांनी ते विकसीत केलं. भाषा म्हणजे - "भाषा आणि तिच्या माध्यमातून मांडलं गेलेलं विश्व यातला संबंध" - या भूमिकेतून फ्रेगे, रसेल, विटेंन्ष्टाईन प्रभृतींनी ही शास्त्र रचलं. पुढच्या काही दशकांमध्ये वेगळ्या बाजूने विचार झाला. भाषा म्हणजे "भाषा आणि मानवाला तिच्याद्वारे होणारं विश्वाचं आकलन यातला संबंध" - असा विचार केला गेला. विटेंन्ष्टाईननेच आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धात हा विचार सुरू केला आणि क्वाईन, ऑस्टीन, सर्ल इ. तत्वज्ञानी तो पुढे नेला.
या सर्व अभ्यासात "अर्थ" हा मुद्दा केंद्रस्थानी होता: भाषा-तत्वज्ञान म्हणजेच अर्थ-तत्वज्ञान! भाषेचा आकृतीबंधाबद्दल कुणी महत्वाचा मुद्दा अजून मांडला नव्हता. ६० च्या दशकात नाओम चॉम्स्कीनी "भाषेच्या" (एका विशिष्ट नव्हे तर सर्वसमावेषक अर्थाने) आकृतीबंधाचा क्रांतिकारी सिद्धांत मांडला.

वैश्विक व्याकरण अर्थात युनिवर्सल ग्रामरः
प्रश्न - माणूस भाषा कशी शिकतो? आणि त्यातही भाषेचा आकृतीबंध कसा शिकतो? आणि इतक्या लहान वयात कसा शिकतो? आणि इतक्या क्लिष्ट बारकाव्यांसकट कसा शिकतो?

यापुढील लिखाणात मी "भाषा" हा शब्द "भाषेचा आकृतीबंध" या अर्थाने वापरणार आहे.

५० च्या दशकात स्किनर या भाषा तज्ज्ञाने कौशल्य/सवय सिद्धांत मांडला. या सिद्धांतानुसार, लहान मुले पाहून पाहून, अनुकरणातून आणि सरावाने भाषा शिकतात. प्रत्येक जन्माला येणारा माणूस भाषेच्या दृष्टीने एक कोरी पाटी असतो. म्हणून भाषा, अगदी पहिली भाषादेखिल, शिकवली पाहिजे - तिची "सवय" लावली पाहिजे.
चॉम्स्कीने यावर आक्षेप घेतला. त्याचे म्हणणे होते की स्किनर सांगतो त्या पद्धतीने उच्चारण, जिभेचे वळण आणि यासारखे भाषेचे काही साधे घटक "शिकले" जाऊ शकत असतील. पण भाषेतल्या क्लिष्ट रचनात्मक भागांची याप्रकारे "सवय" लावून घेता येणे शक्य नाही. त्याने मुख्यतः ३ मुद्दे मांडले.
१. "कच्च्या मालाची कमतरता" - इथे "कच्चा माल" म्हणजे जी आणि जितकी भाषा मुलांच्या कानावर पडते. मुद्दा हा की वयाच्या ६-७ वर्षापर्यंत मुले भाषेचा जितका वैविध्यपूर्ण वापर करू लागतात (भाषिक आउटपुट) ते त्याना मिळालेल्या "कच्च्या माला" च्या मानाने फार फार जास्त असते. विशेषतः "काय योग्य नाही" याबद्दल तर कच्चा माल उपलब्धच नसतो!
२. आकलनक्षमता - ६-७ वर्षांच्या मुलांमध्ये भाषारचनेचे किंवा "व्याकरणाचे" (कर्ता, कर्म, क्रियापद इ. इ. ) नियम समजून घेण्याची क्षमताच आलेली नसते. तरीही या वयापासून मुलांचा भाषेचा वापर हा बराचसा व्याकरणाच्या काही मूलभूत नियमांना धरूनच सुरू झालेला असतो.
३. भाषा शिकण्यातले टप्पे - असे आढळून आले आहे की "सर्व" मुले भाषा एका "ठरलेल्या क्रमाने" शिकतात. जर भाषा शिकणे - खरं तर आत्मसात करणे - हे शिकवण्यावर किंवा अनुकरणावर अवलंबून असतं तर हा क्रम भिन्न भिन्न असायला हवा होता.

यापुढे चॉम्स्कीने मांडले की - म्हणून भाषा शिकण्यासाठीची यंत्रणा माणसात जन्मतःच असली पाहिजे. या यंत्रणेला त्याने "भाषा आत्मसात करणारे उपकरण" (लँग्वेज अॅक्विझिशन डिवाईस) असे नाव दिले. हे उपकरण मानवाच्या मेदूत उत्क्रांतीच्या विशिष्ट टप्प्यांवर विकसीत झाले. अर्थात - भाषा शिकणे हे वेल्डिंग शिकण्यासारखे नसून चालायला शिकण्यासारखे आहे!
पुढे चॉम्स्की आणि त्याच्या शिष्यांनी २ उपसिद्धांत मांडले.
शब्दाचा व्याकरण-दृष्ट्या अर्थ - शब्दाच्या अर्थाचे २ पदर असतात. एक ज्याला आपण अर्थ म्हणतो आणि दुसरा व्याकरणाच्या दृष्टिकोनातून. "मी फूल तोडले" आणि "फूल गळून पडले" या दोन्ही वाक्यात "फूल" चा "अर्थ" तोच पण त्याचा वैयाकरणीय अर्थ वेगवेगळा आहे (एकात कर्म आणि दुसऱ्यात कर्ता). चॉम्स्कीने मांडले की आपल्याला हा व्याकरण-अर्थही उपजतच माहीत असतो.
भाषेचे "पॅरॅमिटर्स" - जर मूळ व्याकरण वैश्विक असेल तर भाषा-भाषात फरक का? याला चॉम्स्कीचं उत्तर असं की मूळ व्याकरण एकच असलं तरी काही मामुली पॅरॅमिटर्स असतात ज्यांत फरक केला की भाषेत (संरचनेत) मामुली बदल होतात. उदा. इंग्रजीत "द रेड बॉल" फ्रेंच मध्ये "ला पोला रोसा" होतं. "ला पोला रोसा" चं शब्दशः भाषांतर "द बॉल रेड" असं होतं. हा असा फरक, चॉम्स्कीच्या म्हणण्यानुसार, एका पॅरॅमिटर मुळे होतो ज्याची किंमत इंग्रजीत आणि फ्रेंचमध्ये भिन्न आहे. हे पॅरॅमिटर्स मुले, "सवयीने" शिकतात.

चॉम्स्कीने जेव्हा हे सिद्धांत मांडले तेव्हा न्यूरोसायंस फारसं प्रगत झालं नव्हतं. पण आधुनिक न्यूरोसायंसमध्ये वैश्विक व्याकरणाला पुष्टी देणारे संशोधन होत आहे.

भाषा-तत्वज्ञानातल्या इतर काही महत्वाच्या शाखा आणि व्यक्तिंबद्दल पुन्हा केव्हातरी!