श्रावण

प्रातःकाळी हरिततृणावर दवबिंदूंचे थेंब नाचती
उन्हाच्या मग लपाछपीमध्ये मोत्यासम ते हळूच चमकती

श्रावणाच्या आगमनाने दगडांनाही पाझर फुटतो
अश्वमेधासम पवन अश्वही वेगाने मग सुसाट सुटतो

शूर वीर ते अडवे पर्वत, मेघांची मग वाट रोखती
तरी मेघ ते माहेरवाशी वर्षाराणीची पाठ राखती

वसुंधरा जेव्हा नटते नेसून, हिरवळीचे हिरवे पातळ
स्थानभ्रष्ट मग तिथेच होती उच्चपदस्थ काळे कातळ

आला आला श्रावण आला, मयूर त्यांचा पिसारा फुलवती
चातकही तेव्हा थेंब झेलूनी, पोटभर मग श्रावण पिती