गाठली ग बाई मी ही साठी
झाली असे बुद्धी माझी नाठी
साठ वर्षे संसार मी भोगला
घेऊन संगती मम सख्याला
अनेक सुखाचे क्षण पाहिले
तसेच दुःखाचे सहन केले
होती शक्ती माझ्या ग अंगात
राहिले उभी मी त्या दु:खात
समाधानी राहिले संसारात
वाटते मन का असे हे अशांत
पाहू फुललेला संसार मुलांचा
त्यांच्या सुखाचा व प्रगतीचा
नाही मन रमत आता कशात
तसेच चटकदार ग खाण्यात
हौस न राहिली कपड्यांचीं
नवीन घडवण्या दागिन्यांची
नाही वाटे हेवा आता कुणाचा
वीट येई चहाड्या करण्याचा
मनाला आली असे विरक्ती
वाटे करावी देवाची ग भक्ती
वाटते राहावे मनाने ते शांत
जीवन जगावे हे खूप निवांत