मुंबईस जाण्याचा योग मजला आला
द्रुतगती राष्ट्रीय मार्ग, मी तो पाहिला
किती सुरेख डौल त्याचा मज दिसला
मम मनाला खूपच मार्ग तो गमला
मार्ग बनला असे हा सुंदर सहा पदरी
घट्ट सिमेंट, खडी व वाळू याचे उदरी
सुसाट पळती मोटारी या अनेक जरी
अडथळा नसतो त्याना या रस्त्यावरी
रस्त्यावर असती अनेक सूचना फलक
रस्त्यामध्ये थांबू नका तुम्ही,हे सूचक
डावा मार्ग असे अवजड वाहन द्योतक
मध्यमार्ग हा हलक्या वाहनास वेधक
उजवा मार्ग असे करण्यास ओव्हरटेक
गती वाहनाची, न करती कमी अनेक
कर गोळा करे सरकार, बनूनी याचक
देती कर,जन अनुभवण्या सफर रोचक
बोगदा असे मार्गात, खूपच लांबलचक
उजळवती त्याला विद्युतदीप ते अनेक
मार्ग स्पष्ट न्याहळती हो वाहनचालक
पार करती बोगदा, मार्ग नसे घातक
प्रवास करता या द्रुतगती मार्गावरून
हिरवे डोंगर, खोल दरी दिसे लांबून
जलप्रपात दिसती पडताना ते मधून
निळ्या अंबरी खग, उडती आवर्जून
मार्ग जोडतो पुणे मुंबई या दोन नगरी
वाटेत लागती अनेक पूल रस्त्यावरी
मार्ग धावतो बोगद्यामधून लांब जरी
चुकत नसे वाट पोहोचवी मुंबईनगरी
मार्गाजवळी उभी असतात विश्रामधामे
शमविण्या तहान,फराळ भोजनादि कामे
रुचकर पदार्थ मिळती अनेक त्यांची नामे
संतुष्टती खाऊन जन, जाती पुढील ग्रामे
पुणे मुंबई प्रवास असे फक्त दोन तासांचा
वेळ जाई तो कसा, कळत नाही सुखाचा
क्षणात पुणे क्षणांत मुंबई खेळ हा मनाचा
सुखद प्रवासासाठी मार्ग असे द्रुतगतीचा