वाघीण
=================
.
.
चढ उताराच्या वाटा ती
एकटीच चालली..
सावलीच्या भुत्याला ती
कधी नाही भ्यायली..
रानातल्या पानगळीत ती
झरझर वाजली..
पाचोळ्या सळसळीत ती
कधी नाही थिजली..
.
डोंगराच्या चढ वाटा ती
एकटीच चढली..
साथीच्या तुफानाला ती
कधी नाही भ्यायली..
जाळीतल्या चमकिला ती
काजवाच बोलली..
वाढत्या अंधारात ती
वाघीण ठरली..
.
चढ उताराच्या वाटा ती
एकलीच चालली..
सदाच्याच डोंगरापुढे ती
अजून ना थकली..
डोंगराच्या चढ वाटा ती
एकलीच चढली..
चढ उताराच्या भोगा ती
पुरूनी उरली........
.
.
=================
स्वाती फडणीस ........ ०४०११०