विठ्ठल

चला जाऊया सारे, विठ्ठलाच्या पंढरीला

पाहू पवित्र नदीला, माय त्या चंद्रभागेला
नदीतील मंदिराला, त्यातील पुंडलिकाला
पुंडलिकाच्या मंदिरातील,त्या विठ्ठलाला
चंद्रभागा नदीचे असे, खोल खोल तीर
असे त्यात खूप निर्मळ, शीतल नीर
शुद्ध होती बुडून त्यात भक्त अनेकवीर
शुचिर्भूत झाले भक्त, दर्शनास अधीर
दर्शन घेऊन भक्त, मातृभक्त पुंडलिकाचे
चालती रस्त्याने गात  नाम विठ्ठलाचे
घेती दर्शन त्या पवित्र नामदेव पायरीचे
धन्य होती घेता ते दर्शन विठ्ठलभक्ताचे
नामदेवावर होतसे, तो विठ्ठल कृपावंत
इच्छा पुरी करतो, त्या नामदेवाची अंत
पहुडला पायरीवर, विठ्ठलभक्त तो संत
घेतसे विश्रांती तेथे, तो चिरकाल निवांत
घेऊन दर्शन भक्त, त्या संत नामदेवाचे
भक्तीने चढती द्वार,  विठ्ठल मंदिराचे
घेत नाम मुखाने,  कृपाळू  विठ्ठलाचे
विसरती कष्ट मग, आपुल्या हो देहाचे
सावळा तो विठ्ठल,  असे उभा वीटेवरी
कर ठेऊन कटावरी, हास्य  ते मुखावरी
भाळी चंदन टिळा, असे त्यात  कस्तुरी
गळा वैजयंती माळा,कासे असे पितांबर
धन्य झाले लोचन,पाहून सावळा विठ्ठल
छबी विठ्ठलाची,  अंतरी राहे  ती  अचल
होत असे मन, चिंतामुक्त  आणि  विमल
ध्यास एकच लागे, हो  विठ्ठल विठ्ठल
डोळा भरुनी पाहती रुप,त्या गोड विठ्ठलाचे
म्हणती सार्थक झाले, आमुच्या हो जन्माचे
मस्तक ठेऊन पायी, दर्शन घेती विठ्ठलाचे
म्हणे भक्त मनी, नाही  भय आता मरणाचे