प्रसन्न होण्या ही लक्ष्मीमाता, जन करती पूजा मनोभावे
रावही असती रंकही असती, पूजा करती आपुल्या नावे
सबलही असती दुर्बलही असती विनवती सांगून दावे
प्रसन्न व्हावी लक्ष्मी वाटत असे प्रत्येकास आपुल्या ठावे
दारिद्र्य घालविण्यास पूजा करती रंक हे धनलक्ष्मीची
लक्ष्मी येताच विसरून जाती, पहा आठवण दारिद्र्याची
स्थिर करती कोणी ह्या लक्ष्मीस, कर्मे करुनी पुण्याची
खर्चती कोणी, व्यसनात बुडवती, कामे करुनी पापाची
स्वप्ने बघती बरेच सुजन, झटपट धनवान होण्याची
वाट शोधती आपुल्या परिने लवकर श्रीमंत होण्याची
कुणास वाटे जुगार असे ही वाट जवळची श्रीमंतीची
कुणी मानतो रेस घोड्याची, असे वाट ही नशिबाची
काळाबाजार करुनी कोणी, कमवती आपुली धनसंपदा
मद्य गाळुनी, विकती, मिळवती धन पडती ते आपदा
सुपारी घेऊन, धन मिळवण्याची दाखवती कोणी अदा
करुनी सौदा, आपुल्या शीलाचा, धन बटोरती वसुधा
राजकारण कोणी खेळतात, मिळवण्यास या लक्ष्मीला
पक्ष फोडिती, निष्ठा विकती, घेऊन अमाप संपत्तीला
खोटी वाटे पक्षनिष्ठा, लालची बनती पाहून धनाला
राजकारणात, क्षम्य सर्व, हात घालती ह्या भावनेला
सत्तेचा वापर करती कोणी, मिळवण्या अशा धनाला
लाच घेऊनी, धन्य होती, साठवुनी ठेवती लक्ष्मीला
नकली माल अस्सल म्हणुनी विकून मिळवे धनाला
कोणी दाखवे व्यंग स्वतःचे, विनवुनी मिळवे धनाला
कोणी लक्ष्मीपुत्र उडवती धनाला करुनी अनेक पाप
कुसंगे राहून, छळे पित्याला, देती कोणी खोटी थाप
मद्य, नशा, स्त्रीसंग करुनी बोलावती विविध रोगाला
अपमान करू न लक्ष्मीचा, हे मिळवती अब्रू धुळीला
फुकटचा पैसा हाती येता, बिघडे यांचा तोल मनाचा
असंख्य व्यसने येऊनी भिडती, न लागे थांग व्यसनाचा
कमाऊन धन असे समाधान सुख नसते त्याच्या मनाला
हव्यास असे अधिक धनाचा, विसरती आपुल्या भुकेला
बिनधास्त होऊनी करती चुका हे कमी लेखून लक्ष्मीला
अति तेथे माती होतसे, शिक्षा मिळतसे त्यांच्या चुकीला
कमावत असे कोणी धन हे वागून आपुल्या सचोटीने
समाधान विलसे मुखावरी त्याच्या खडतर कसोटीने
नामवंत होती, गुणवंत होती हे, वागून आपुल्या हतोटीने
सन्मार्ग दाखवी, आपुल्या धनाला. हे संताच्या घसटीने
महत्त्व जाणुनी लक्ष्मीचे, जे कष्ट देती आपुल्या शरीराला
मती न ढळते संकटात त्यांची, मदत करती दुसऱ्याला
लक्ष्मी मिळो तेवढीच, जेवढी गरज असते गरजवंताला
बघुनी सारे खेळ लक्ष्मीचे, बजावतो मी माझ्या मनाला