सहाच्या लोकलची घोषणा झाली आणि शांताराम जरा सैलावला. अधिकृतपणे त्याची रात्रपाळी संपली होती. पण त्याच्याजागी येणारा मनोजसिंग नेहमीप्रमाणे अजून आलेला नव्हता. मनोजसिंग एक नंबरचा चुकार आणि आळशी माणूस. कधीही वेळेवर हजर नसायचा. स्वतःशीच मान हलवत शांतारामनं आपली रायफल खांद्यावर लटकवली, जवळची पाण्याची बाटली उचलली आणि तो त्याच्या काळ्या संरक्षक कड्याच्याआडून बाहेर आला. समोरच्या स्वच्छतागृहात जाऊन त्यानं तोंडावर थोडं पाणी मारलं. अर्धवट झोप आणि कालपासूनच्या शिणवट्यावर एवढासा उपाय पुरेसा नव्हता. तरीही गार पाण्यानं त्याला तात्पुरतं बरं वाटलं.
स्टेशनात तुरळक प्रवाश्यांची लगबग चालू होती. एक-दोन लांब पल्ल्याच्या गाड्या सुटायच्या बेतात होत्या. त्याचीही थोडीफार वर्दळ होती. इतर वेळेला या सुमाराला स्टेशन तसं निवांत असायचं. पण आज मात्र जिकडेतिकडे कालच्या गोंधळाच्या खुणा दिसत होत्या. जागोजागी पोलीसही उभे होते. न राहवून शांतारामची नजर रेल्वे पोलिसांच्या कार्यालयाकडे वळली. काल सोबत आणलेली त्याची कपड्यांची बॅग अजूनही मागच्या कोपऱ्यात तशीच पडलेली त्याला दिसत होती. ठरल्याप्रमाणे सगळं झालं असतं तर काल संध्याकाळी तो त्याच्या गावी जाणाऱ्या गाडीत बसणार होता. वर्षभरानंतरच्या या सुट्टीसाठी त्यानं किती वाट पाहिली होती...
चहावाल्याकडून शांतारामनं चहा घेतला आणि एक सुस्कारा टाकून तो वळला. त्याच्या संरक्षक कड्याला आरामात टेकून उभा असलेला बन्सी त्याला लांबूनच दिसला. ते पाहताच त्याच्या कपाळावर नकळत एक आठी पडली. त्या जागेच्या आसपास दोन फुटांपर्यंत कुणालाही फिरकू द्यायचं नाही असा शास्त्रीसाहेबांचा सक्त हुकूम होता. दिवसभर ये-जा करणारे प्रवासीही गणवेषातल्या रायफलधारी माणसाला बघून जरासे बिचकून लांबूनच जायचे. पण हा बन्सी मात्र मुद्दाम तिथे खेटून, रेलून उभा रहायचा. शांतारामला डिवचायचा.
"काय राऽव, अजून तुमी इथंच...?", शांताराम जवळ आल्याआल्या बन्सीनं त्याला टोकलं. त्याचं हे नेहमीचंच होतं पण आज त्याच्या सुरातला खोचकपणा शांतारामच्या जरा जास्तच जिव्हारी लागला. त्याच्या कपाळावरचं आठ्यांचं जाळं अजूनच वाढलं.
"एऽऽ, जा ना, तू तुझं काम कर ना बे..." खांद्यावरची रायफल हातात घेताघेता तो बन्सीवर खेकसला.
"तेच तर करायला आलोय...", हातातला पेपरचा गठ्ठा रघुवीर स्टॉलवाल्या विलासकुमारच्या पुढ्यात ठेवत बन्सी म्हणाला.
विलासनं शांतपणे पेपरांचे वेगवेगळे गठ्ठे करायला सुरूवात केली. त्याला या दोघांच्या भांडणात कधीच फारसा रस नसायचा.
"हे बग, आज काय छापून आलंय ते... मला कामं शिकवतोय!", गठ्ठ्यातला सर्वात वरचा पेपर शांतारामसमोर नाचवत बन्सी पुन्हा खोचकपणे म्हणाला.
"पेपरात वेगळं काय असणारे? काल बगून राह्यलोच की सगळा तमाशा इथं..." शांतारामनं त्याच्याकडे दुर्लक्ष करायचा नव्यानं प्रयत्न केला.
"ते नाय, त्याच्या खालचं वाच."
बन्सीच्या सुरातला तिरकसपणा आता विलासलाही जाणवला.
शांतारामनं बन्सीच्या हातातला पेपर हिसकावून घेतला. पहिल्या पानावरची ठळक बातमी अर्थातच कालच्या चेंगराचेंगरीची होती. मात्र त्याच्या खाली छापून आलेल्या एका छोट्याश्या चौकटीतली बातमी पाहताच त्याला छातीतून एक बारीकशी कळ गेल्यासारखं झालं. गडचिरोली जिल्ह्यातल्या भामरागड तालुक्याच्या जंगलात पोलिसांच्या तुकडीवर मोठा हल्ला झाला होता. बातमीवरून त्यानं झरझर नजर फिरवली. शेवटपर्यंत पोलिसांना कुठलीही मदत मिळू शकली नव्हती. सतरा पोलीस मारले गेले होते, वीस-पंचवीस जखमी झाले होते. एक क्षणभर शांतारामनं डोळे मिटून घेतले. भामरागड... तिथेच तर तो लहानाचा मोठा झाला होता! त्याचे वडील तिथल्या लाहिरी पोलीस ठाण्यात हवालदार होते. गडचिरोलीबाहेरचं जग त्यांना ठाऊकच नव्हतं. मोठेपणी आपला मुलगाही पोलीसदलात भरती होऊन याच पोलीस ठाण्यात पण आपल्यापेक्षा वरच्या हुद्द्यावर काम करेल इतकंसंच स्वप्नं होतं त्यांचं. पण आक्का गेली, त्या धक्क्यानं पाठोपाठ आई गेली आणि वडलांनी हायच खाल्ली. घरादारावरूनच नाही तर आख्ख्या आयुष्यावरूनच त्यांचं लक्ष उडालं...
आक्काची आठवण येताच पुन्हा एकदा शांतारामच्या छातीतून बारीकशी कळ गेली. पेपरांचा अजून एक गठ्ठा घेऊन येणाऱ्या बन्सीच्या अंगावर त्यानं स्वतःच्या हातातला पेपर तिरीमिरीत फेकला.
"हे मला कशाला दाखवतोयस, बे? तिकडं गडचिरोलीत पोलिसांच्या जीवाला धोकाय ही काय माझी चूक आहे का?", तो बन्सीवर पुन्हा खेकसला.
त्याक्षणी खांद्यावरचं ओझं बन्सीनं दाणकन् खाली आदळलं आणि वेडेवाकडे हातवारे करत तो म्हणाला, "तिकडं तुमचे पोलीस कुत्र्याच्या मौतीनं मरतायत अन् हे इथं उभे... रेल्वे स्टेशनात, एका कोपऱ्यात, गर्दीवर बंदूक रोखून!"
"मग मी काय माझं इथलं काम टाकून तिकडं धावू का?"
"इथलं काम?? ते तरी कुठं जमतंय तुमाला नीट? अजूनही बेवारशी सामान सापडतंय, माणसं घाबरतायत... काल तर त्या पिशवीत चाकू, सुरे आणि पिस्तुलं होती म्हणे! 'सशस्त्र पोलिसांची करडी नजर' असं छापायला या पेपरवाल्याच्या बापाचं काय जातंय?"
"मी पोलीस नाहीय..."
"अरे हो! तू पोलीस नाई, तू तर शीआरपीयेफचा जवान! पण काळं कुत्रंही विचारत नाय इथं तुला. त्यापेक्षा परत जाऊन तिकडच्या तुझ्या पोलीसांना सांभाळ, जा!"
"जाने दे ना, बन्सी. तू अपना काम कर और उसको अपना काम करने दे..." कधी नव्हे तो विलास मधे पडला.
"मैं तो मेरा काम कर ही रहा हूँ. पण या साल्यानंच आपल्या दामूचाचाला काम करू दिलं नाही. याच्यामुळेच काल चाचाला आपले प्राण गमवावे लागले..."
ते ऐकताच पेपरांची वर्गवारी करण्यात गुंतलेले विलासचे हात गप्पकन् थांबले. ठळक बातमीतल्या १ ठार, ४६ जखमीमधला तो 'एक' चाचा होता?!
"दामूचाचा... गया??", विश्वास न बसून त्यानं बन्सीला विचारलं.
"गेला... काल रात्री, उशीरा...!" बन्सीच्या डोळ्यांत आता पाणी तरारलं होतं.
शांतारामलाही ते ऐकून थोडा धक्का बसला, नाही असं नाही. तसाही काल दीडदोन तास सगळा राडाच झाला होता स्टेशनात. लोकंसुध्दा लगेच विनाकारण किती घाबरतात, सैरावैरा पळत सुटतात. चेंगराचेंगरी झाली नसती तरच नवल होतं. त्यातच हा चाचा सापडला असणार, नक्कीच!तरीही त्यानं साशंक स्वरात बन्सीला विचारलं, "तुला कसं कळलं?"
"मीच काल त्याला घेऊन गेलो होतोऽऽ दवाखान्यात", डोळ्यांतलं पाणी पुसत बन्सी उत्तरला, "पण तुला काय रे त्याचं... तू तुझ्या या काळ्या पोत्याआडून बाहेर नको निघूस, मग बाकी स्टेशनात काय चाल्लंय हे तुला कसं कळणार? म्हणूनच म्हणतोय आता फार झालं, चालता हो तू इथून..."
बन्सीला आता हे नवं कोलीत मिळालं होतं. पण वर्षभरापूर्वी इथे स्टेशनात तैनात होणं जसं शांतारामच्या हातात नव्हतं तसंच आता इथून जाण्याचा निर्णयही तो घेऊ शकत नव्हता.
शांतारामच्या कपाळावर पुन्हा आठ्या पडल्या. आता अजून इथं किती दिवस, किती महिने थांबावं लागणार होतं कोण जाणे! आपली सुट्टी सुरू होण्याच्या दिवशीच हे सगळं का घडावं?? पुढच्या पंधरवड्यात आक्काचं श्राध्द करायचं ठरवलं होतं आपण. मुलाच्या ऍडमिशनचंही बघायचं होतं. त्यानंतर परत येताना आजारी वडलांना तो सोबत घेऊन येणार होता. इथल्या मोठ्या हॉस्पिटलात त्यांना दाखवायचं होतं. कशी आणि कधी व्हायची आता ही कामं??... विचार करून करून शांतारामचा मेंदू थकून गेला होता.
काल पोलीस मुख्यालयात आलेल्या त्या निनावी फोननं कसं सगळं उलटपालट करून टाकलं होतं, शांतारामसाठीही... आणि बन्सीसाठीही!
----------
अंबरनाथ-स्लो ची घोषणा झाली तशी बन्सीनं मनातल्या मनात एक शिवी हासडली. आज त्याला चांगलाच उशीर झाला होता. इंटरसिटीचेही प्रवासी यायला कधीचीच सुरूवात झालेली होती. एव्हाना लाल डगला अंगावर चढवून तो तयार व्हायला हवा होता. पण आज अजून दहा नंबरवरच्या अंबाजीवाल्याकडे पेपर पोचवून व्हायचे होते. आज मुळात पेपरचा टेंपोच उशीरा आला. त्यात त्या साल्या शांतारामनं वेळ खाल्ला आपला...
शांतारामची आठवण येताच बन्सीनं स्वतःशीच अजून एक सणसणीत शिवी हासडली आणि डोक्यावर लटकणाऱ्या मोठ्या घड्याळाकडे नजर टाकत पेपरचा शेवटचा गठ्ठा उचलला.
स्टेशनात लोकांची वर्दळ वाढायला लागली होती. दिवस फुटायची खोटी की माणसं लगेच घराबाहेर कशी पडतात याचं बन्सीला नेहमी नवल वाटायचं. पंधरा-वीस वर्षांपूर्वी एका पहाटे आपल्या मामाबरोबर तो प्रथम या स्टेशनावर उतरला तेव्हाही त्याला असंच नवल वाटलं होतं.
कालच्या गोंधळानंतर आज ठिकठिकाणी पोलिसांचे जथ्थे दिसत होते पण बंदोबस्ताला असल्यासारखे नाहीत तर खुर्च्या टाकून निवांतपणे गप्पा मारत बसलेले! घाईत असणाऱ्या बन्सीला त्यांची अडचणच होत होती. पण बोलायची सोय नव्हती. आणि बोलणार तरी काय आणि कुणाला?
"ये लो कांतीसेठ, आज की ताजा खबर", 'अंबाजी न्यूजपेपर ऍन्ड बुक स्टॉल' अशा पाटीच्या खालीच बसलेल्या कांतीभाईला उद्देशून बन्सी म्हणाला, "और वो दुकान का पाटी जल्द से जल्द नया बनवा लो मराठीमें... अभी कल ये जो लफडा हुआ है उसके बाद दो-तीन नेतालोग तो विजिट मारने आयेगाच इधर... किसीने तुम्हारा ये ए-बी-सी-डी पाटी देख लिया तो फिर तुम तो गये..."
"... बारा के भाव में!", कांतीभाईनंच तोंड वेंगाडत बन्सीचं वाक्य पूर्ण केलं, "हाँ, हाँ, मालूम है तेरा बारा का भाव, जब देखो टोकता रहता है!"
त्यावर बन्सी अजून काहीतरी बोलणार होता. कांतीभाईला उचकवायची एकही संधी तो सोडत नसे. पण आज त्याला तितकी सवड नव्हती. हसत हसतच तो परत फिरला. दिसेल त्याची चेष्टा-मस्करी करण्याच्या त्याच्या या सवयीवर दामूचाचा कायम नाराज असायचा. चाचाची आठवण येताच बन्सी एकदम गंभीर झाला. चाचाला जाऊन अजून चोवीस तासही उलटले नाहीत आणि आपण पूर्वीसारखंच काम करतोय? कांतीला चिडवतोय? शांतारामशी भांडतोय??... बन्सीला स्वतःचंच आश्चर्य वाटलं. चाचाला आपण इतक्यात विसरलो?... छे! ते या जन्मी तरी शक्य नाही.
दामूचाचाशिवाय होतं कोण आपलं या स्टेशनात...
...आणि आता त्याच्याशिवाय कोण उरलंय आपलं या जगात?
डोळ्यांतून पुन्हा एकदा निसटू पाहणारं पाणी निकरानं मागं परतवत बन्सी परत एक नंबरच्या दिशेनं निघाला. वाटेत एका हवालदारानं त्याला हटकलंच.
"ए, जा जरा सगळ्यांसाठी चहा सांग..." शेजारीच खुर्च्यांवर बसलेल्या पाच-सहा पोलिसांकडे निर्देश करत हवालदारानं हुकूम सोडला. ते ऐकताच बन्सीच्या डोक्यात तिडीक गेली. मी काय याच्या बापाचा नोकर आहे का याला चहा आणून द्यायला? अंगात वर्दी आहे म्हणून इतका माज??
"एऽ, मराठी समझता नहीं है क्या? या सुनाई नहीं देता? जाऽ, सब के लिये चाय ले के आ..." हवालदार पुन्हा भुंकला.
त्याला फटकन् काहीतरी सुनावण्यासाठी बन्सीची जीभ सळसळली. पण तो गप्प बसला. आधीच त्याला उशीर झाला होता, त्यात त्याला आता अजून एक भांडण करायचं नव्हतं. त्यानं हवालदाराचा निरोप चहावाल्याला सांगितला आणि स्वतःसाठीही एक चहा मागून घेतला. इतक्यात इंटरसिटीच्या डब्यांची घोषणा व्हायला सुरूवात झाली. बन्सीनं चहाचा पेला घाईघाईनं तोंडाला लावला. त्यासरशी गरम चहानं त्याची जीभ चर्रकन भाजली. एक क्षणभर तो कळवळलाच...
रोज इतका उकळता चहा दामूचाचा तरी कसा काय प्यायचा कोण जाणे! त्याचं तोंड कसं भाजायचं नाही कधी?... बन्सीला वाटून गेलं. या गरमच्या हव्यासापायीच कुणी चहा आणून दिलेला दामूचाचाला आवडायचा नाही. तो स्वतःच चहावाल्याच्या गाडीपाशी जाऊन प्यायचा. पण मागल्या पावसाळ्यात पाय घसरून पडल्यामुळे चाचा लंगडत चालायला लागला होता. तेव्हापासून त्याला चहा नेऊन देण्याचं काम बन्सीनं स्वतःवर घेतलं होतं. चहावाल्याकडून तो एक छोटी किटली मागून घ्यायचा, त्यात एक पेला चहा ओतून किटली घट्ट लावून किटलीसकट चाचाच्या दिशेनं सुसाट पळत सुटायचा आणि गरमागरम, फक्कडसा चहा चाचाला बसल्या जागी मिळायचा...
कालही संध्याकाळी सहाच्या सुमाराला जेव्हा पोलिसांच्या आठ-दहा गाड्या सायरनचे जोरजोरात आवाज करत स्टेशनात येऊन धडकल्या तेव्हा बन्सी पुलावर बसलेल्या चाचासाठी चहाच तर घेऊन निघाला होता...
----------
डुलत डुलत येणाऱ्या मनोजसिंगला पाहून शांताराम अवाक् झाला. याला काही परिस्थितीचं गांभीर्य आहे की नाही? कडक इस्त्रीचा युनिफॉर्म, तेल लावून चापून चोपून विंचरलेले केस, कानात अत्तराचा बोळा... काल इथे काय घडलंय आणि हा कुठल्या जगात वावरतोय! ना कामाचं भान, ना वेळ पाळायचं भान!
"इतना लेट क्यूँ आया?" शांतारामनं जरा घुश्श्यातच मनोजला विचारलं.
".........."
"साब कभी भी राऊंड पे आ सकते हैं... मालूम है ना तेरेको?"
"दस बजे से पहले किदर आते हैं वो!", कोरड्या आवाजात मनोज म्हणाला.
"पण आपण आपला टाईम पाळायला नको? कितने बजे ड्यूटी स्टार्ट होती है तेरी? और तू कितने बजे आया है?"
"एखादा तास इकडं तिकडं... काय फरक पडतो?", मनोजचा आवाज अजूनही तेवढाच कोरडा होता.
"काय फरक पडतो काय? तेरे आने से पहले अगर मैं निकल जाता तो...?", शांतारामला हसावं का रडावं ते कळत नव्हतं.
नुकताच भरती झालेला हा कालचा पोरगा; मुळात त्याला अशा महत्त्वाच्या ठिकाणी नेमलंच कसं याचं शांतारामला आश्चर्य वाटलं होतं. तरूण वय, गावाहून बायकोला सोबत घेऊन आलेला, म्हणून त्याच्याच विनंतीवरून गेले दीड-दोन महिने शांतारामनं सलग रात्रपाळीही केली होती. पण तरी दिवसा नेमून दिलेलं काम यानं नीट करायला नको? थोडं सांभाळून घ्यावं म्हटलं तर याची ही अशी बेफिकीरी...
पण यातलं काहीही मनोजच्या गावीही नव्हतं. उत्तरादाखल तो नुसता त्या काळ्या संरक्षक कड्याच्या आत जाऊन मख्खपणे उभा राहीला होता. खांद्यावरची रायफल काढून त्यानं पुढ्यात आडवी मांडून ठेवली होती. त्याच्या निरिच्छ हालचाली शांताराम बघत होता. ना तडफ, ना उत्साह! म्हणूनच बहुतेक शास्त्रीसाहेबांनी आपल्याला काल दुपारी पुन्हा बोलावून घेतलं...
मग तो जरा समजुतीच्या स्वरात मनोजला म्हणाला, "देखो मनोज, अबी इदर सिच्युएशन टाईट है ना जरा? कल से देख रहा है ना तू? तो ऐसा नहीं करने का... वेळेवर यायला पायजे, नीट पहारा द्यायला पायजे..."
"पण आपला पहारा इथं, काल ती पिशवी सापडली तिकडं... तीन नंबरवर! फिर टाईमपे आनेका और इमानदारीसे काम करने का क्या मतलब रहा?"
".........."
"कालपासून हे पोलीस, बाकी आने-जानेवाले हमें इस तरह घूर रहे हैं की मानो वो हमारीही गलती थी! स्टेशनात घुसायच्या दहा वाटा आहेत इथं, आपलं लक्ष फक्त या मेनगेटला! पर ये कोई नहीं देखता...", मनोज तावातावानं म्हणाला. त्याच्या कपाळावरची एक शीर आता फुगली होती.
शांताराम ते ऐकून जरा चपापलाच. म्हणजे मनोजलाही ते जाणवलंय तर... हा कालचा पोरगा वाटतो तितका बेफिकीर नाहीय, तो विचार करून बोलतोय... आणि खरं बोलतोय!
काल अर्धवट झोपेतून उठून, जड डोक्यानं आपण स्टेशनात परतलो तेव्हाच्या शास्त्रीसाहेबांच्या नजरेतही अगदी मनोज म्हणतोय तसेच भाव होते...
एकीकडे त्या बन्सीला वाटतं की आपल्याला इथं काळं कुत्रंही विचारत नाय, पण असं काही घडलं की मात्र आपल्याकडं बोट दाखवलं जातं! असं का?काल तीन नंबरवर जिन्याखाली ती बेवारस पिशवी सापडली. तेव्हाच तिकडं पोलीसांना स्टेशनात बॉम्ब ठेवल्याचा फोन आला. दहा मिनिटांत ढीगभर पोलीस इथं आले. आल्याआल्या त्यांनी असे काही हुकूम सोडायला सुरूवात केली की जणू आम्ही त्यांचे नोकरच!
त्यात पुन्हा सगळ्यांची ती टोचणारी नजर... आपल्याला गुन्हेगार ठरवणारी, आपली बाजू मांडायची संधी न देणारी!
टोचणारी नजर... कधी परक्यांची तर कधी आपल्याच माणसांची!...
वीस वर्षांपूर्वी ट्रेनिंग संपवून गावी परतलो त्यादिवशी तिथं झालेल्या नक्षलवादी हल्ल्यातही आपली काय चूक होती? आक्का किती कौतुकानं स्टेशनात आपल्याला घ्यायला आली होती... पण काही मिनिटांत सगळं संपलं! आपण सोबत असताना आक्काला गोळी लागलीच कशी हा प्रश्न आईला मृत्यूनं ओढून नेईपर्यंत तिच्या नजरेत आपण घडीघडी वाचला... आपल्याला मिळालेलं ट्रेनिंग वाया गेलं असा ग्रह करून घेऊन वडलांचा भकास चेहरा आपल्याकडे सतत त्याचं स्पष्टीकरण मागत राहीला...
ना तेव्हा आपण त्यांना काही पटवून देऊ शकलो, ना काल शास्त्रीसाहेबांना...!
मग गेलं वर्षभर इथं स्टेशनात खडा पहारा देऊन शेवटी हाती काय आलं आपल्या? फक्त ही टोचणारी नजर! तो बन्सी म्हणतो ते पटतं कधीकधी. परत गेलं पाहीजे आपण. पण परत म्हणजे कुठं जाणार? गडचिरोलीला? पण तिथंही असलंच काहीतरी काम करावं लागणार. दुसरं येतंय कुठं काय आपल्याला! आणि मग तिथं तरी काल झाला तसला पोलिसांवरचा हल्ला टाळू शकू आपण? ते कुठंय आपल्या हातात? नेमून दिलेलं काम इमानदारीनं करणं यापलिकडं खरं म्हणजे आपल्या हातात काहीच नाही. पण मग लोकांची ती नजर??...
शांतारामचं डोकं आता चांगलंच भणभणायला लागलं होतं.
कालपासून तीच ती विचारांची वावटळ, खोल गर्तेत घेऊन जाणारी, हाती भल्या थोरल्या शून्याशिवाय काहीही न देणारी...
काल संध्याकाळी शास्त्रीसाहेबांचा तातडीचा निरोप आल्यावरही शांतारामला फारसं काही वेगळं, वावगं वाटलं नव्हतं. आपण सुट्टीवर जाण्याआधी साहेबांना काहीतरी महत्त्वाचं बोलायचं असेल असा विचार त्यानं केला. मात्र त्याची गाडी रात्री आठाची होती. म्हणून तो सामान घेऊनच घरातून निघाला होता.
काय ठरवलं होतं आणि प्रत्यक्षात काय घडलं होतं...!
डोक्यातले सगळे विचार झटकून, झिडकारून टाकायचा प्रयत्न करत शांताराम रेल्वे पोलिसांच्या कार्यालयाकडे वळला. आत जाऊन मागच्या कोपऱ्यातली त्याची बॅग उचलून त्यानं मनोज उभा होता तिथल्या खांबापाशी आणून ठेवली.
आता कधी एकदा साहेब येतायत आणि त्यांना सांगून आपण घरी जाऊन आडवं पडतोय असं झालं होतं त्याला.
----------
गाड्यांच्या, प्रवाश्यांच्या आणि सामानाच्या कचकचाटातून थोडी सवड काढून बन्सी जिना चढून वर दामूचाचा जिथे बसायचा त्या पुलावर गेला. माणसांचे लोंढे चहूबाजूंनी अंगावर येत होते. जो तो स्वतःच्याच नादात होता. काल संध्याकाळच्या घटनेशी कुणालाच आता सोयरसुतक नव्हतं. कालपर्यंत इथं एक म्हातारा बूटपॉलिशवाला असायचा, आज तो दिसत नाहीय याच्याशी कुणालाच काही देणंघेणं नव्हतं.
तीन नंबरच्या जिन्यापाशीच चाचा बसायचा. बन्सी त्या जागी गेला. तिथं आता एक आंधळा माणूस लॉटरीची तिकिटं विकत उभा होता. तिथं आसपास चाचाचं काही सामान, काही वस्तू पडल्या असतील तर त्या गोळा करून आणायचं बन्सीनं ठरवलं होतं. चाचाचं बूटपॉलिशचं लाकडी खोकं उलटंपालटं होऊन एका कडेला पडलेलं होतं. बन्सीनं जाऊन ते उचललं. कालच्या चेंगराचेंगरीत अनेकांच्या पायदळी तुडवलं गेलेलं चाचाचं विटलेलं, जीर्ण झालेलं बस्कर त्या आंधळ्या लॉटरीवाल्यानं आपल्या काठीनं बाजूला लोटून दिलं होतं. बन्सीनं ते ही उचललं.
बन्सीला आठवत होतं तेव्हापासून दामूचाचा हेच बस्कर वापरत होता. लहानग्या बन्सीला शेजारी बसता यावं म्हणून तो त्याची एक घडी उलगडून ठेवायचा. दारुड्या मामाची वाट्टेल ती कामं करण्यापेक्षा बन्सीलाही चाचाशेजारी बसून त्याचं बूटपॉलिशचं काम निरखायलाच जास्त आवडायचं. पुढे बघूनबघून बन्सीही ते काम शिकला. नंतर स्टेशनात हमालीही करायला लागला. बन्सी आणि दामूचाचा - दोघांचाही एकमेकांवर फार जीव होता. त्या दोघांच्यात प्रत्यक्षात काहीही नातं नाहीय हे स्टेशनातल्या अनेकांना माहीतही नव्हतं.
दामूचाचाच्या आठवणींनी बन्सीला भडभडून आलं...!
भर गर्दीच्या वेळी सापडलेली ती बेवारस पिशवी आणि अचानक स्टेशनात येऊन धडकलेले इतके पोलीस या दोन्हीची भलतीच सांगड घातली गेली होती. बॉम्बनाशक, स्फोटकनाशक पथकं येण्यापूर्वीच अफवेच्या, भीतीच्या, घबराटीच्या बॉम्बगोळ्याचा स्फोट झाला होता.
दामूचाचासाठी चहा घेऊन निघालेल्या बन्सीला काही उमगायच्या आत तीन नंबरच्या जिन्यावरून भेदरलेल्या माणसांचा प्रपात वर यायला लागला...
अचानक शेकडो पाय जीव वाचवण्यासाठी सैरावैरा धावायला लागले...
शेकडो हात वाटेत येणाऱ्याला बाजूला ढकलायला लागले...
जिन्याच्या कोपऱ्यात बसलेल्या लंगड्या म्हाताऱ्या दामूचाचाला उठून उभं रहायचीही संधी मिळाली नाही.
तास-दीडतासाच्या अफरातफरीनंतर, दुसऱ्या दिवशीच्या पेपरातल्या ठळक बातमीची सोय करून दिल्यानंतरच तो गोंधळ शांत झाला...
चेंगराचेंगरीत गुदमरून चाचाची अवस्थाही त्या बस्करासारखीच होऊन गेली होती!
दामूचाचाच्या वस्तू बन्सीनं छातीशी कवटाळून धरल्या...
चाचामुळे शांतारामला आणि त्याच्या त्या साहेबाला अशी काय आणि कितीशी अडचण झाली असती? तिथंच थोडं बाजूला सरकूनही चाचाची सोय लावून देता आली असती. पण त्या हरामखोरांनी चाचाला त्याच्या इतक्या वर्षांच्या जागेवरून उठायलाच लावलं शेवटी! आपण किती भांडलो होतो त्यादिवशी त्यांच्याशी! शेवटी चाचानंच आपल्याला गप्प केलं होतं. साहेब काही ऐकत नाहीत म्हटल्यावर चाचाच आपणहून वरती पुलावर जाऊन बसायला लागला होता. त्या साल्या शांताराममुळेच...
बन्सीचं डोकं पुन्हा सटकलं!
त्या तिरीमिरीतच तो जिना उतरून एक नंबरवर आला. हातातल्या वस्तू विलासच्या स्टॉलच्या वरच्या पत्र्यावर ठेवताना मनोज उभा होता तिथल्या खांबाजवळ एक काळ्या रंगाची जुनाट बॅग त्याला दिसली. पुन्हा? तसलीच बॅग?? हो, तिच्या आसपास कुणी नाही म्हणजे ती तसलीच असणार! कालपासून पोलीस लाऊडस्पीकरवर ओरडून सांगतायतच की!
बन्सी एकदम सटपटला. कालच्या अपघाताची भीषण भुतं पुन्हा एकदा त्याच्या नजरेसमोर फेर धरून नाचायला लागली...
----------
शास्त्रीसाहेबांबरोबर पोलीस मुख्यालयात गेलेला शांताराम स्टेशनात परतला. आता गावच्या पोस्ट ऑफिसात फोन करून त्याला आपण आज येत नसल्याचा निरोप द्यायचा होता. तो फोन बूथपाशी पोचत नाही इतक्यात हातात मोठे कॅमेरे धरलेल्या एकदोघा टी.व्ही.वाल्यांना स्टेशनाच्या बाहेर जायला सांगणारा एक हवालदार त्याला दिसला. अचानक शांतारामला वातावरणात कसलीतरी विचित्र अस्वस्थता जाणवली. कुठलेही अंदाज बांधायच्या फंदात न पडता त्यानं तडक आपला मोहरा एक नंबरवरच्या त्याच्या रोजच्या उभं राहण्याच्या ठिकाणाकडे वळवला.
त्या जागेभोवती पोलिसांनी मोठं कडं केलं होतं. मनोज दूर एकटाच उभा होता. सगळ्या पोलीस इन्स्पेक्टरांच्या तोंडाला वॉकीटॉकी लागलेले होते. दोन आणि तीन नंबरवरच्या गर्दीचे शेकडो डोळे त्या जागेकडे रोखून बघत होते. आदल्या दिवशी स्टेशनाची कसून तपासणी केल्यानंतर स्टेशनातच थांबवून ठेवण्यात आलेल्या बॉम्बनाशक पथकातली माणसं मधोमध ठेवलेल्या एका काळ्या बॅगेतून एकएक वस्तू बाहेर काढत होती.
शांतारामनं ती बॅग पाहिली आणि तो मट्कन खालीच बसला.
----------
त्या बॅगेत कुठलीही स्फोटकं किंवा काहीही धोकादायक वस्तू न सापडल्यानं पथकातल्या माणसांनी सुटकेचा निःश्वास टाकला आणि आपलं साहित्य, आयुधं इ. घेऊन ते लोक निघून गेले. दोन आणि तीन नंबरवरच्या गर्दीचीही पांगापांग झाली.
चंदनाचे टिळे लावलेले दोन फोटो - एक आईचा, दुसरा आक्काचा; वडलांसाठी घेतलेली लेंग्या-सदऱ्याची जोडी, त्यांच्या नावाची मोठ्या हॉस्पिटलाची एक फाईल, मुलासाठी फुटपाथवरून घेतलेलं पैसे ठेवायचं छोटं पाकीट, स्वतः शांतारामचे काही कपडे... बन्सीनंच पुढं होऊन विखुरलेल्या सगळ्या वस्तू बॅगेत भरल्या. कोऱ्या चेहऱ्यानं ती बॅग त्यानं शांतारामकडे आणून दिली.
साहेबांच्या टोचणाऱ्या नजरेला नव्यानं तोंड कसं द्यायचं या चिंतेखाली दबलेल्या शांतारामच्या पायात आता उठून उभं राहण्याचंही त्राण उरलेलं नव्हतं.
मनोज मख्ख चेहऱ्यानं आपल्या जागी येऊन उभा राहीला होता.
एक नंबरवर प्रवाश्यांची वर्दळ पुन्हा पूर्ववत सुरू झाली होती...!
(समाप्त)