अंगाई गीत - श्याम सावळासा ..
जरासा जरासा, जरा साजरासा
असा बाळ माझा, श्याम सावळासा ...!!
चांदण्या स्वरूपी, चंदनाचे अंग
मुख पाहतांना, तारकाही दंग
असा बाळ माझा, चंद्र गोजिरासा ...!!
नेत्र काजळीले, बिंदू तीट गाली
टिळा देखुनिया, दृष्टही पळाली
असा बाळ माझा, विठू हासरासा ...!!
ओठाशी अंगुठा, अमृतासमान
तुला चुंबण्याला, शेसाविते मन
असा बाळ माझा, गोड देखणासा ...!!
आली बघा आली, नीजराणी आली
लुकलुक पापण्यांची, पेंग लुब्ध झाली
निजे बाळ माझा, राम सुंदरासा ...!!
गंगाधर मुटे
.....................................
ही रचना गेय असल्याने समर्पक
चाल योजुन सहज गाता येईल
.....................................