ओढणी

गव्हाळ मानेवरी
लव सोनेरी,
तुझी नित्य असे
पखरण तीवरी.

गोऱ्या गालावरती
नित्य खळीचे पडणे,
तिच्याशी तुझे
लाघवी भिडणे.

नाजूक बोटांची
स्पर्श पारायणे,
त्यासाठीच तुझे
पुनःपुन्हा घसरणे.

वक्षकमानींवरले
तू एकरंगी इंद्रधनू,
विरळल्या ढगांआड
दूहेरी चंद्रतनू.

कमरेला कधी तुझी
करकच्चून मिठी,
झुरणारे जीव कितिक
तुझा जन्म घेण्यासाठी.
000