मराठियांच्या या भूमीवर,
स्वागत साऱ्या भारतियांचे!
या मित्रांनो, या प्रेमाने!
पहा, आमुची दिलदार मने! // धृ//
ऐका इथली मराठ-बोली,
अमृताशी ही पैजे तोली!
संतांनी तिज कशी खुलवली,
सामाजिकता हिस शिकवली!
पावन व्हावे भक्तिरसाने!
या मित्रांनो, या प्रेमाने! //१//
दऱ्या नि डोंगर पर्वत-राने,
गर्जत उठली, पराक्रमाने!
दूर्ग येथले, गाती महती,
शौर्याची अन चातुर्याची!
श्रावण करा रे, उत्तम कवने!
या मित्रांनो, या प्रेमाने! //२//
नद्या आणिती उदंड पाणी,
धरणे भरली, न्हाली शेती!
शेतकऱ्यांनी, कामकऱ्यांनी,
घाम गाळले, रानो-रानी !
तृप्त व्हा चला, मृद्गंधाने!
या मित्रांनो, या प्रेमाने //३//
शिक्षण आणिक सहकाराचे,
धडे गिरवले, मानवतेचे!
आम्ही यात्रिक प्रगतिपथाचे!
जित्या-जागत्या कर्तृत्वाचे!
प्रसन्न व्हावे, मुदित मनाने
या मित्रांनो, या प्रेमाने! //४//
वैभव इथले, अभ्यासावे,
गुह्य त्यातले, ध्यानी घ्यावे!
स्पर्शूनी ही, पवित्र माती ,
परत फिरा रे, अपुल्या देशी!
कित्ता गिरवा, सामर्थ्याने!
या मित्रंनो, या प्रेमाने! //५//
देश आपुला शिवरायांचा!
सल्ला त्यांचा बहुमोलाचा!!
छत्रसाल जो ऐके त्यांचे,
राज्य स्थापितो बुंदेल्यांचे!!
अनुसरा त्या, आनंदाने !
या मित्रांनो, या प्रेमाने //६//