गृहीत

ओझे सावरत
काळजीपूर्वक चालत
आर्तपणाने हसत.
नेहमीच पाणावल्या
वाटणाऱ्या डोळ्यांनी,
तू उतरतेस माझ्या आत
आता वेगळ्याच वाटांनी.

मी आतून पोखरलेला
भांबावून गेलेला
दाटून आलेला.
घट्ट करतो
माझं आक्रंदणारं मन,
दबता दबत नाहीत
तुझ्यासोबत जगलेले क्षण.

बरे होतो दोघेच
दोघांच्या दुनियेत
आनंदात.
मायबाप होण्याच्या ओढीने
या वाटांवर,
विलगणार तर नाहीत ना नावा
या अवघडल्या लाटांवर.
...

स्वच्छ नितळ मन
थोडेसे तरंगलेपण
गाठतो माहेर तुझे हवेवर स्वार होऊन.
अन धरून घेतो गृहीत
'तू कशी आहेस, '
किरकिरणाऱ्या आवाजाची
'ती कशी आहे? '
***