दान
वाटले उगाच
जाहले समुद्र
स्थिरावले आता
खोल, गूढ॥
भाव का भंगला
उसळूनी आला
आत कोंडलेला
नदीपणा॥
नदीभावे येती
उसळूनी जाती
लाटाही फुटती
लालसेच्या॥
लालसा खेचली
माया संकोचली
भयप्रद नदी
भोवऱ्यात॥
उधळिले पाणी
----'नदी पूर आणी'
जळासी खेचता
--'घास घेई'॥
ओळख आपली
आपणां जाचली
लाजही दाटली
अंतर्यामी॥
नदी वा समुद्र
आपले आपण
ईशा द्यावे दान
स्वीकाराचे॥