तू नसताना
मनात हुरहुर
आठवणींचा पूर अनावर,
एकटेपणा दूरदूर
गहीवराचे ओझे मनावर.
तू नसताना
जीवाची तगमग
सभोवताली तुझ्याच प्रतिमा,
विरोधात हे सारे जग
अन् दुःखाला नसते सीमा.
तू नसताना
कडवटलेले सारे घास
जाहलेला जीव निशाचर,
झाडापानात तुझेच भास
स्पर्शभ्रम ते अन् अंगावर.
तू नसताना
सोबत असते तुझी आस
काट मारलेल्या तारखा,
तुझ्या येण्याचा घेऊन ध्यास
उत्सुक होतो मी सारखा.
तू नसताना
स्वप्न उराशी वेडेभोळे
येऊन गुपचूप पाठीमागून,
झाकशील तू माझे डोळे
हसशील कानाशी लागून.
***