वाट पाहणं!

कुणाचीही वाट पाहणं मोठं जीवघेणं असतं!
नक्की कुण्या जन्माचं राहिलेलं देणं असतं!!

कवितेची ओळ साधी, हवी तेव्हा स्फुरते का?
डोळ्यांपुढे झोपसुद्धा नको तेव्हाच येते ना?
हटखोर वळवासारखं यांचं येणं असतं..

वळवाचं काय म्हणा, त्याचं कामच भिजवण्याचं!
गारव्याची आस, पुन्हा हृदयात जागवण्याचं!!
आणिक हवं असण्याचं, दु:ख नेहमी दुणं असतं..

ज्याच्यासाठी जगतो आपण, त्याच्याविना जगतो(च) का पण?
इवलासा प्रश्न आता एवढा मोठ्ठा वाटतो ना पण?
त्या अनामिक ओढीचंही आपल्याकडून नेणं असतं..

राघव