त्याच्याच गाडीवर कोणी दगड मारत नाही
जो स्वतःबरोबर सर्वांना गाडीत बसवतो
ही माणसे असतात अनुस्वारांसारखी
ज्यांच्यामुळे प्रचंड अर्थ साधता येतो
स्वतःच्या विषाची खात्री नाही
असाच साप दोन वेळा चावतो
दिलेल्या उत्तराची खात्रीनाही
अघळ-पघळ, इ. इ. च असतो तो
गेल्यावर कामासाठी, हे कळायला हवे
उगीच न बसता आता उठायला हवे
ठाशीव ठशाप्रमाणे वागणे जमायला हवे
अधोरेखित मजकुर असतात हे
शब्द पाळण्यानेच अंतिम टप्पा गाठतो
ना लांडी लबाडी कधी करतो तो
स्वार्थासाठी स्वतःस ना फसवतो तो
सरळ रेषेसारखा नेहमीच चालतो तो
कोणालाही वाटावे हात टाकावा खांद्यावर
साधेच राहतात जरी गाठले शिखर
भार असतो लवचिकपणा बाणवण्यावर
कधी नाजुक ऱ्हस्व,तर कधी कठोर दीर्घ उकार
सततच यश मिळते एखाद्याला
दुसऱ्यांच्या पोटात लागते ढवळायला
लागतात फराट्याप्रमाणे ओढायला
विस्कटवतात कधी यशस्वी रफाराला
नांग्या पसरून सतत आव्हान देतो खेकडा
फेंगड्या पायांनी गाठतो मुक्कामाचा कठडा
दुहेरी कंसासारखे ठरवितात आखाडा
नकोच असतो निष्कारण तंटाबखेडा
उमटते आश्चर्य सदैव चेहऱ्यावर
अजून चांगले करण्यावरती भर
प्रश्नचिन्ह उभे राहते सदा समोर
मगच येते उत्तर अगदी बरोबर
काळजी जगाची अन कृती अजागळाची
स्वल्पविरामासारख्या आडमुठ्या स्वभावाची
हौसच ह्यांना नेहमी अडथळे आणायची
अर्ध्या घटनेचा अर्थ बदलायची
हे सारे लोभसवाणे देखणे
ना ठाऊक ह्यांचे ठावठिकाणे
मोडीलिपीसारखी घेती वळणे
समजून न घेता ह्यात न पडणे
नुसत्या अस्तित्वानेच ओळख होते
नवनवीन नाते जोडले जाते
नियमबद्ध म्हणून जग कळते
हेच ते कवितेचे शिर्षक असते
वळणे ही सारी असतात कमनीय
जीवघेणी, विलोभनीय
कधी पहिली , दुसरी वेलांटी ही गेय
चूक होताच ऱ्हस्वाचे दीर्घ सहज होय.
*मला जेव्हढी जमली तेव्हढी