"आत्महत्या एक पर्याय"

मद्यात भावनांचा काहूर पाहिला मी।ध्रु।
डोळ्यात दारिद्र्याचा महापूर वाहिला मी॥

वस्त्रे घालण्याला, अंगात आज नाही।
पोटात अन्न घालण्या, नसे कण काही॥
त्या मोडक्या झोपडीत, ना दिवा लावला मी॥ध्रु॥१॥

सरकारी योजनांना, उत आज भारी आला।
मिळेल काम सर्वा, हवे आज ज्याला॥
त्यातही भ्रष्टाचाराचा दर्प साहिला मी॥ध्रु॥२॥

बसलो कवटाळून, निराशेचे सर्व ओझे।
संपेल का कधी हे, दारिद्र आज माझे॥
तेव्हाच आत्महत्येचा पर्याय निवडला मी॥ध्रु॥३॥

अनंत खोंडे. ३\३\२०१०.