अहो अहो सज्जनहो । मित्र, बंधू स्वजनहो ।
ऐकून घ्यावे सुजनहो । नवे आख्यान ॥१॥
गम्मत जरी वाटे भारी । परी आहे पुर्ण खरी ।
विचार करावा अंतरी । प्रत्येकाने ॥२॥
आज जाहले समाधान । आले अनंदा उधाण ।
चेहरा नुरे म्लान । तिळमात्रही ॥३॥
द्रुश्य ऐसे देखिले म्या । चक्रावलो पाहुनिया ।
ऐसी कैसी बरे दुनिया । या बांधवांची ॥४॥
नवरस जरी काव्यात । येथ केवळ शान्त ।
परी रसरस अंतरात । प्रत्येकाच्या ॥५॥
राहणे जरी श्रीमंत । उपभोगण्या नाही उसंत ।
कामेची असती अनंत । यांच्यापुढती ॥६॥
ईश्वरदत्त बुद्धिवैभव । कर्तुत्व उदंड संभव ।
परी आंग्लान्नी घेतला ठाव । चित्तव्रुतिचा ॥७॥
वातवरण ते आर्द्र । रव म्रुदू किंबहुना मंद्र ।
लक्षण ऐसे अभद्र । कैसे करावे ॥८॥
न हास्य न सन्वाद । नचानंद न दाद ।
झालेच तर वाद । वरचेवरी ॥९॥
पाठलाग करिती वरिष्ठ । धनेची होती संतुष्ट ।
अन्यथा येते अरिष्ट । ओघानेची चाकरिसी ॥१०॥
परी राखण्या मसांक पुष्ट । घेती बापुडे बहू कष्ट ।
सोडविती असाध्य क्लिष्ट । समस्या संगणक बुद्धिने ॥११॥
वेळ होता भोजनाची । संधी मिळे मग बोलायाची ।
शक्य तेवढे पुसयाची । एकमेका हिताहित ॥१२॥
भोजनग्रुहिच तस्मात । गप्पा गोष्टी विनोदात ।
मन रमे पाहण्यात । जिवंतपणा ॥१३॥
पुन्हा रुजू कामास । आणिक सज्ज अनुभवण्यास ।
डावलून अपुल्या अनिच्छेस । स्मशानशांतता ॥१४॥
प्रकाशयोजना जरी उजळे । अथवा ठेविली सर्वत्र कमळे ।
परी जीव अंतरी तळमळे । पाहण्या माणुसपण ॥१५॥
दिवसभर तेथ बैसून । घरी परतती कष्टून ।
सोबतिस येती घेउन । व्याधी नाना ॥१६॥
रक्तचाप अणिक शर्करा । तनभारा नाही उतारा ।
अमंत्रण देती विकारा । मनाचियाही ॥१७॥
सप्ताहातील पाच दिवस । नाही वेळ कुटुंबास ।
वचन देती मुलान्स । पुढील सप्ताहिचे ॥१८॥
असावे क ऐसे जिणे । आयुष्यातून सुख उणे ।
सहस्रो रुपडे काय करणे । सुखापुढती ॥१९॥
त्यापरी आम्ही कवी बरे । आनंद गगनी न पुरे ।
मुक्त जीवन बरे । समाधानाचे ॥२०॥
म्हणुनी आनंदी जाहलो । संगणक अभियंता न झालो ।
सुखास नाही मुकलो । आयुष्यात ॥२१॥
रामाने रचिले जीवन । क्रुपेने दिधले माणुसपण ।
जपोनिया ते मिळवावे पण । समाधान ॥२२॥
भले बुरे नाही ज्ञान । म्हणुनी पाजळिले अज्ञान ।
बुद्धिनेही सान । वर्णाया आख्यान ॥२३॥
समजुनी घ्यावा गर्भितार्थ । इच्छा मनिची आर्त ।
व्हावे सर्वान्नी कृतार्थ । घेउनिया चिदानंद ॥२४॥
॥ लेखनसीमा ॥
॥ श्रीराम ॥