बंद दारांच्या चौकटी
एका पाठोपाठ एक
" भिंतीविना"
शब्द प्रगटला, की वाणी जणू
की आकाशवाणी ?
बाहेर मात्र कल्लोळ झाला.
कुणी म्हणाले, "बा प"
कुणी म्हणाले, "नसता ताप"
कुणी म्हणाले, "देव"
कुणी म्हणाले, "प्रेषित"
मग आल्या झुंडीच्या झुंडी
आत शिरायला गर्दी झाली
दरवाज्यांच्या बाजूने , भिंती नसल्याने
पण शरिरांना मज्जाव होता
कारण आतले अशरीरी होते.
प्रवेश न मिळाल्याने
प्रथम प्रार्थना झाली
मग समजावणी झाली
शेवटी गुद्दे दाखवले गेले
पण प्रवेश नाकारला गेला
हा विरोधा करिता विरोध?
की आणखी काही?
कळेचना........
आतला इझम वेगळा होता
बाहेरचा इझम वेगळा होता
मग पुन्हा शब्द उमटले
" मेल्यावर या.......
म्हणजे प्रवेश पत्रिकेची गरज नाही,
नागडे उघडेपण वस्त्र प्रावरणे
यांचा संबंध नाही,
मग आपली जात एकच आहे
अशरीरी, अशरीरी ."