देशाटनी एका शहरी प्रासादाच्या प्रांगणी
दिसली त्याला एक ललना फिरताना उपवनी
सिंहकटी ती कांचनगौरी मूर्तिमंत रागिणी
चाफ्याचा दरवळ जिला अशी शुक्राची चांदणी
रत्नखचित गुलाब घेउन सेवक एक धाडिला
चोळित गाल खाउनी एक श्रीमुखात आला
प्रतिमदनसा मगधराज तो चिंताक्रांत झाला
चतुरचोंबड्या कुरुपरांगड्या आणा विदूषकाला
संकेत जाई संकेत येई संवाद संकेतांचा
सांकेतिक जणू खेळ चाले प्रेम पाखरांचा
चातुर्य तिचे पाहून झाला घात विदूषकाचा
जीव जडला हंसिनीवर पाहा कावळ्याचा
लावूनी डोके घेऊनी धोके मोठ्या हिकमतीने
जिंकिले तिचे हृदय त्याने राजाच्या वतीने
राकारजनीस राजभेटीस ती येता गजगतीने
प्रथमदर्शनी भिजल्या नयनी हसला केविलवाणे
चतुरा जरी प्रीत माझी तुजला गमणार नाही
बुद्धीहीन जरी श्रीमान तो सुखे त्यासव राही
जळते मन तन जळते माझे होते लाही लाही
अंतर्यामी आक्रंदतो मी पण बोलणार नाही
(द. मा. मिरासदारांच्या 'कोणे एके काळी' या कथेवर आधारित. यात मी जीएंची एक उपमाही वापरली आहे. )
-- निरंजन नगरकर