आभाळ

आपण तुटतच गेलो सारखे
तुटल्यापासून नाळ
तरी तुझ्यावर पांघरलेलं
आहे माझं आभाळ.

रांगता-चालतानाच
दुडुदुडू धावलीस
कधी पापे घेतलेस
कधी कडकडून चावलीस

हळूहळू तोडत गेलीस
भावगर्भांचे पाश
कळलंही नाही कधी पांघरलंस
जाणीवांचं आकाश.

विसरून निष्ठुर कायदे
मी झाले आश्चर्यचकित
जेव्हा निघून गेलीस तू
हळूच त्याच्या मिठीत.

म्हणायचीच 'उपटून दुसरीकडे
लावता येईल का झाड?
रुजतील का मुळे त्याची
होईल का गं वाढ! '

कळलं ना 'जागा असते दुय्यम'
फक्त माया जिवंत हवी
मग रमतोच जीव कुठेही
उमलते पालवी नवी.

परक्या बागेत उमललीच आसवे
तर तुझी तूच ढाळ
पण नको विसरू कधीही
पांघरलेलं आभाळ.
000