आहोत ना आपण दोघं...

आता थांब थोडीशी
पुरे झाली दगदग,
आयुष्यभर राबूनही तुला
कसा नाही येत उबग?

आठवते विशीतली
तुझ्या कपाळीची चंद्रकोर,
काय तुझी नव्हाळीची
मनातले नाचरे मोर.

सकाळीच विझवून दिवे
तू कामामागे लागायचीस,
राबून सारा दिवसभर
सारं सोसून वागायचीस.

नाही हरखवू शकलो तुला
आणून एखादी भेट,
तरी भिडून राहिलीस तू
या ह्ऱदयाशी थेट.

कधी गमावून आधार
माझा झोक जायचा,
हलत्या काळजाचा झोका
तुझ्या डोळ्यात दिसायचा.

चार तपं झाली असतील
पण वाटतं क्षण चार,
आताशीच तर झाला होता सुरू
तुझा माझा संसार.

पोरं सुना उडून गेली
सारा चिवचिवाट घेऊन,
पण नको म्हणूस कधी
'काय करायचं जगून! '

आहोत ना आपण दोघं
जगू नवी कहाणी,
गुणगुणू एखादं गाणं
कधी पुसू डोळ्यातलं पाणी.

आता कर पोळ्या छान
मी भाजी खुडू की तांदूळ नीसू,
घटकाभराने देऊ ढेकर
मग गप्पा मारत बसू.
000