तारुण्य

एक चमत्कारिक आकर्षण ल्यालेली
गुणांपेक्षा रुपावर भाळलेली
प्रेमाचाही विषय सहज होण्यातली
ती काही वर्षे तारुण्य प्यालेली

भान वयाचे हरवून जीभ सुटलेली
सभा चावटपणाने धुंद झालेली
बाटलीत सभ्यपणाला बुडवलेली
ती काही वर्षे तारुण्य प्यालेली

पुसली जात अन मैत्री घट्ट आवळली
उगीचच धुरात खिदळत घुसमटलेली
कधी वार काळजात तर कधी कमरेखाली
ती काही वर्षे तारुण्य प्यालेली

कृतीच्या परिणामांना न घाबरणारी
भले कशात ते आकलन न होणारी
चुकांना नकळत धाडस समजणारी
ती काही वर्षे तारुण्य प्यालेली

होती बेधुंद वस्त्रांनीच नटलेली
निर्धन तरीही लखलख पांघरलेली
संधीचा शोध घेत भरकटलेली
ती काही वर्षे तारुण्य प्यालेली