बर्फ़ावरचं रांगणं... घसरणं .......!!

मी : आईस स्केटिंग, रोलर स्केटिंग, स्कीइंग (ह्या शब्दांना मराठी शब्द माहीत नाही.)  ह्याने पाठीच्या मणक्याचा खूप चांगला व्यायाम होतो आणि एक विशिष्ट तंतू असतो आपल्या मणक्याचा तो विकसित होतो. 

सुजीत पाठीचाच व्यायाम करायचा असेल तर जीव न देता करता येण्यासारखे , कमी धोक्याचे बरेच व्यायाम प्रकार आहेत, मी माझ्या हाता - पायांवर प्रेम करतो, तुला दात तोडून घ्यायचे असतील तर जा आणि हो, मेडिकल इन्शुरन्स चं कार्ड मला देऊन जा.
                        वरील संवादाचा तिखट फटका बसल्यावरही स्वारी ऐकते कुठे? जी गोष्ट आपण केली नाही कधीच , ती करून बघायचीच (काही अपवाद सोडून उदा. विष गोड लागतं की कडू ?) आणि मेरिल डेव्हिस व चार्ली व्हाईट ह्या जोडीने तर "वाईट" प्रोत्साहन दिलं. दुवा क्र. १ ह्या दुव्यावर व्हिडिओ बघू शकता."मेरा चैन वैन सब उजडा... जालीम नजर हटाले.. ", "ये दिया मैने न बुझने दिया.. " दोनच कलाकार.... असंख्य प्रेक्षक... ४ पायांच्या विशिष्ट आणि लयबद्ध हालचाली... फिगर स्केटिंग ऑन आईस... ठरवलंच मग. भारतीय संगीतावर हे अमेरिकन्स इतके थिरकता आहेत, तर मग मी आईस स्केटिंग च्या रिंग मध्ये जाऊन कमीत - कमी चाललं... रांगलं.... तरी पाहिजे. 
                       "नवनीत माझा मित्र" प्रमाणे, "युट्युब" माझा मित्र ... वर मी आईस स्केटिंग चे व्हिडिओज परत- परत बघून घेतले... आणि दुर्दम्य इच्छाशक्ती,पुरेपूर आनंद लुटण्याची हौस... आणि मॉडर्न भाषेत सांगायचं झालं, तर "यो ऍटिटुड" ने निघालो आईस स्केटिंग च्या रिंग कडे. 
"एकांत, गुलाबाचे फुल आणि सुवास...
बस... बसलीस की आय लव्ह यू... " ह्या "एका लग्नाची गोष्ट" नाटकाच्या "सुत्राप्रमाणेच",
"गुडघे सरळ नाही करायचे, वजनाचा केंद्रबिंदू मागे न जाऊ देता पुढे वाकायचं.. आणी एक पाय स्थिर ठेवून .. एक पाय पुढे सरकवायचा... हेच सुत्र मी मनाशी घोकत होतो.
           
                             १० वी त कधी तरी एक कविता शिकलो होतो, स्केटिंग करता करता त्या ओळी आठवू लागलो. "धावत्याला शक्ती येई आणि रस्ता सापडे... " ह्या त्या ओळी. त्या कवितेच्या ओळीचं एवढं जिवंत उदाहरण मला आयुष्यात कधी शिकायला मिळेल असं वाटलं नव्हतं.लोकं संकटात "हनुमान चालिसा" वगैरे पुटपुटतात आणि मी कवितेच्या ओळी मनाशी घोकत होतो. अरे कवितेचे कवी कोण ? न्यूरॉन सर्च सुरू झालं, अरे ही कविता ९ वी ला होती की १० वी ला? कवी दि. पू. चित्रे की अजून कोण ? "आजचा विद्यार्थी शिक्षणार्थी की विद्यार्थी" ह्या निबंधात चांगलं उदाहरण म्हणून टाकता येईल ही "न्यूरॉन सर्च". "न्यूरॉन सर्च" म्हणजे जसं 'गूगल' मध्ये काही शोधण्यासाठी आपण काही तरी लिहितो आणि "सर्च" म्हणतो तसं... "न्यूरॉन सर्च". .... धाप्प्प....ऑ.... आ ~~~~....!! "लागलं का रे ? चैतन्य चे शब्द ऐकू आले, "आर यू ऑलराईट"? "डू यू निड हेल्प टू गेट अप? " नो थॅक्स". कवितेच्या ओळींच्या मंत्राने "चांगलाच रस्ता" सापडला होता आणि पाठ चांगलीच शेकली गेली होती."मन वढाय वढाय.. ‍ जसं उभ्या पिकातलं ढोर... " कुठे ही भटकत आणि मग चांगलीच शेकाशेकी होते. तरी बरं आडवा झाल्यावर आधी गुडघ्यावर बसून मग उभे राहण्याची कल्पना चांगली होती, ह्याचा अनुभव आला.
                              पुढे हळू- हळू स्केटिंग जमायला लागलं अगदी "मेरिल डेव्हिस आणि चार्ली व्हाईट" वगैरे सारखं नसलं तरी... मला पुरेपूर आनंद होईल असं तरी करू शकलो आणि ते ही "दात - हात- पाय न तोडता". जन्माला आलेलं बाळ आधी फुटबॉल खेळतं म्हणजे पाय मारतं ... नंतर घुडग्यांवर वजन देऊन रांगू लागतं ... नंतर मग कशाचा तरी आधार घेऊन एक-एक पाऊल टाकू लागतं. त्याचे कुटंबिय त्याला मोठ्या कौतुकाने , आनंदाने प्रोत्साहन देतात, पण तो त्यांच्या प्रोत्साहनाने कमी पण " काही तरी नवीन करण्याची इच्छाशक्ती आणि त्यातून मिळणारा भरपूर आनंद त्याला मिळवायचा असतो. तसंच मी हि हे बर्फावरचं रांगणं ... चालणं ... सरकणं .... खूप खूप आनंद देऊन गेलं. 
                             बर्फाच्या रिंग ला ४-५ फेऱ्या मारल्यावर, थोडी विश्रांती घेतली आणि तेव्हा चैतन्य शी गप्पा मारत होतो. 
"अरे मला इथे नुसतं पुढे सरकणं ही एवढं कठिण जातं आहे , घाम फुटतो आहे आणि ते सकाळच्या व्हिडिओ मधलं पब्लिक ... उड्या वगैरे मारतं.... नाचतं...बर्फावर ते ही... स्केटस घालून ...!!!! कसं जमत असेल रे? 
" अरे ते लोकं जन्मले ना त्यांचे आई - बाप त्यांना बर्फाच्या डोंगरावरच टाकतात. " इति चैतन्य चा भन्नाट युक्तिवाद.
ह्या स्केटिंग च्या अनुभवावरून एक मात्र शिकायला मिळालं,
"माणूस इथेच घडतो.... किंवा घडविला जातो म्हणणं योग्य ठरेल... माणूस कधी 'तसा' जन्मावा लागतोच असं नाही.. निसर्गाने मानवाल भरपूर दिलं आहे, त्याचा उपयोग करावा आणि आनंद मिळवावा".