भोंडला,हादगा आणि भुलाबाईची गाणी : महिलांच्या व्यथा. भाग-२

भोंडला,हादगा आणि भुलाबाईची गाणी : महिलांच्या व्यथा. भाग-२
भुलाबाईचे गाणे हा तत्कालीन सामाजिक अविष्कारच असणार.
साहित्य हा समाजाचा आरसा असतो असे म्हणतात.
परंतू थोरा – मोठ्या कवी / लेखकांच्या साहित्यात ते वास्तव
प्रामाणिकपणे उतरलेले नसावे.
त्या काळात संतकवी देवास भजण्यात गुंग, त्यांचे बहूतांश काव्यवैभव/प्रतिभा देवाचे गुण गाण्यात खर्ची पडली असावी. कवी तर मुळातच कल्पना विलासात रमणारा प्राणी. त्यातही कवी हे पुरूषच. त्यामुळे महिलांचा कोंडमारा झाला असावा. आणि कदाचित त्यामुळेच अपरिहार्यपणे महिलांनी प्रस्थापित काव्याला फ़ाटा देवून स्वत:चे काव्यविश्व स्वत:च तयार केले असावे. पहाटे जात्यावर म्हटलेली गाणी असो वा बाळाला झोपवतांना म्हटलेली गाणी (अंगाईगीत?) असोत, ही त्यांची स्वरचित गाणीच आहेत. त्यामुळेच त्यांच्या या गाण्यात थोडाफ़ार यमक जुळवण्याचा भाग वगळला तर ज्याला आपण साहित्यीक दर्जा म्हणतो तो कुठेच आढळत नाही. आढळते ते निव्वळ वास्तव.
या गीतात आईच्या घराला सोन्याची पायरी आहे असे म्हटले आहे.
मग हे काय आहे? कल्पनाविलास की अतिशयोक्ती? माहेरच्या बढाया की वास्तवता?
मला यामध्ये एक भिषण वास्तविकता दिसते.कारण…
पाखरू माहेरघरा गेल्यानंतर त्याने तिच्या आईचे घर कसे ओळखायचे? काही वेगळेपण असावे ना सहज ओळखण्यासाठी? घराचे कवेलू, छप्पर, भिंती आणि दरवाजे हे नक्किच सांगण्यायोग्य नसणार.
"जेव्हा एखाद्याकडे सांगण्यासारखे काहीच नसते तेंव्हा तो बढाईचा आधार घेत असतो" हेच तर त्रिकाल अबाधित शाश्वत सत्य.
मग तीने सोन्याची पायरी सांगीतली त्याचा वेगळा अर्थ कसा घेणार?
आणि त्यावरी (पायरीवर) बसजो, शिदोरी सोडजो म्हणजे काय?
निरोप घेवून जाणार्‍या पाखराला सोबत नेलेली शिदोरीच खाण्यास सांगायला ती विसरत नाही. का?
तर पाखराला तातडीने जेवायची व्यवस्था आईच्या घरी होऊ शकेल अशी परिस्थीती आईचीही नसावी.(?)
रूणझुन पाखरा जा माझ्या माहेरा
माझ्या का माहेरी सोन्याची पायरी
त्यावरी बसजो शिदोरी सोडजो
माझ्या का मातेला निरोप सांगजो
तुझ्या का लेकीला बहू सासुरवास
होते तर होऊ दे औंदाच्या मास
पुढंदी धाडीन … गायीचे कळप
पुढंदी धाडीन … म्हशीचे कळप
.
गंगाधर मुटे
…………………………………..
या गाण्याचा शेवट गोड करण्यासाठी
तुझ्या का लेकीला बहू सासुरवास
ऐवजी
सुखी आहे मयना आईला सांगजो
असा बदल करून गायला जाते अशी माहीती मिळाली.
……………………………………………………