चांदरात

काजळकाळा कृष्ण जणू
व्यापून गेला रान,
काळ्याकुट्ट आसमंती
अवघडून उभे एक पान.

मिट्ट झुळूक वाऱ्याचीही
सरसरत निघून गेली,
अंधारा बिलगून बसल्या
गडद मिठीच्या वेली.

अशा या गर्द प्रवाही
चंद्रकिरण सळसळले,
त्या तिथे असावे क्षितिज
पहुडल्या ओढ्याला कळले.

सोडते गंधीत हुंकार
रानफुलांची जाळी,
दूर आतुरला घुबड
देतो कुणा आरोळी.

हाळीने अपशकुनाच्या
अंधार गहिरा बावरला,
डोहात पहुडला चंद्रही
हलकेच जरा थरथरला.

चंद्राने प्रसवल्या प्रतिमा
जणू तिच्या पायीचे चाळ,
चंद्राचे खेळती वंशज
करुनी रुपेरी ओळ.

ही माळ चांदपुतुळ्यांची
रात्र घालुनी सजते,
कल्पून स्वतःचे रूप
गडद स्वतःशी हसते.

000