शब्दस्पर्शाने काढेन जखम तुझी भरून
हळव्या हळव्या वेदनेला फुले देईन माळून
हलक्या माझ्या हाताचा पक्षी बसेल भाळावर
त्याची ऊब दिशांतून उतरते बाळावर
काही माझ्या, तुझ्या काही भिन्न वयाच्या गोष्टी
सांगत राहिन चवीने रात्र करीत उष्टी
असा,तसा दोन्हीकडून जन्म जायचा वाहोनी
एक वाट पाताळाची आकाशासंगे दुसरी
तुझ्या टपोऱ्या डोळ्यांना ग कुणी सुचवला खारा थेंब?
लपतो फुलल्या मोगऱ्यातही, सापाचा ना काही नेम
मातीवरती टाक पाऊले पुसताही येतील कधी
शिल्प नको कोरूस नको ठेऊस पुरावे पत्थरीही
आता सवड मिळालीच आहे तर घे दिशांस न्याहाळून
गर्भाला अंदाज असो जे अंतर जाण्याचे धावून
सांग ना ग कुणी पळवला तुझा आवडता ठेवा?
संध्येला भरकटे अश्रुच्या पक्ष्यांचा का थवा?
तुझे नाही इथले काही, अदृष्टातून आले कूळ
आदीम अंतीम सत्याला की जसे लगडते शहाणे खूळ!