एकेक आवर्तन.
एकेका अनुभवाचे धागे.
एकेका फांदीचं एकटेपण.
मनाच्या विषमावस्थेत सुचलेले तुकडे.
क्वचित तिच्या हातांचा स्पर्श आणि क्वचित स्वतःचं संपलेपण.
बाळमुठीत झाकलेल्याची कधी अचानक ओढ तर कधी उद्ध्वस्त इतिहासाची भैरवी.
स्वतःत गुंतून पडलेलं राजस सुख आणि कधी आकाशाकडे कढत डोळ्यांनी पाहणारं टोकदार दुःख.
कधी कुणावर तुटून पडणारं जन्माचं निलाजरं सत्य तर कधी अचानक जाणवणारं मृत्यूचं मार्दव.
मोकळं व्हायचं आहे म्हणणारा आणि तरी शरीरात गुरफटत जाणारा एकेक श्वास.
अधांतराविषयी बोलणारा, अधांतरात जगणारा माणूस.....
आणि थांबत, अडखळत.. क्वचित गिरक्या घेत तिथपर्यंत जाण्यासाठी धडपडणारी कविता.
तिचं गाणं कसं होणार?
अशा कवितेच्या नशिबी कागदाची घडी आणि तोंडावर बोट.