’जस्ट फॉलो युवर ड्रीम!’’
तो म्हणाला आणि निघून गेला. मी पाहत राहिलो त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे. त्या आकृतीच्या पार्श्वभूमीवर असलेल्या स्ट्रीट लाइटच्या मंद पिवळ्या प्रकाशाने पिवळटसर झालेल्या चौकाकडे, चौकातल्या पुतळ्याकडे.
’जस्ट फॉलो युवर ड्रीम!’’ त्याने गंभीरपणे उच्चारलेलं हे एक वाक्य मला या पिवळसर प्रकाशात ठळकपणे दिसत होतं. ते वाक्य माझ्या मनात... मेंदूच्या पेशींच्या पोकळीत वाजत होतं...
मी त्याला माझी नोकरी, त्यातलं फ्रस्ट्रेशन/कंटाळा/समाधान इत्यादी गोष्टींवर खूप बोललो त्याच्याशी भरभरून. सगळी मळमळ काढून टाकली आणि त्यानंतर तो अत्यंत गंभीर स्वरात म्हणाला हेच ते वाक्य- ’जस्ट फॉलो युवर ड्रीम!’’ आणि मी गप्पच झालो एकदम. चिडीचूप गप्पगार! तो निघून गेला खरा तरातरा. पण मी विचार करू लागलो. काय आहेत माझी स्वप्नं? आपण इतका वेळ- अॉफिसातल्या सगळ्या गोष्टींना शिव्या दिला, फ्रस्ट्रेशन काढलं परंतु आपल्याला नेमकं काय करायचंय याचा विचार कुठे केलाय आपण?
तसा एकच एक विचार घेऊन, त्या ध्येयाने वेडे वगैरे होऊन एकच दिशा ठरवून मार्गक्रमण करणारा वाटसरू मी नव्हे! मला पटतच नाही ते फारसं. कारण माणसाला किंवा मला तरी बदल हवा असतो. त्यामुळे दिशा ठरवून मार्गक्रमण करणं ठीक. परंतु त्या वाटेवरही अनेक फाटे, चोररस्ते कंवा गुहा लागतील त्यातही गेलं पाहिजे असं वाटतं मला. त्यामुळे भरकटूही आपण (कदाचित त्यातून चंद्रशेखर सानेकरांनी त्यांच्या एका गझलेत म्हटल्यासारखं, हेच भरकटणे उद्या होईलही माझी दिशा असंही होईल) त्यातून कदाचित वेगळी वाटही सापडेल आपल्याला. कदाचित अलिबाबाची गुहाही सापडेल आपल्याला. वाट चुकणं किंवा भरकटणं हे महत्त्वाचं नाहीच माझासाठी किंवा तसं काही नसतंच मुळी असं वाटतं मला...
तो मला सांगून गेला-‘’जस्ट फॉलो युवर ड्रीम!’’ आणि मी विचार करू लागलो काय करतोय आपण! रोजच्या रूटिनच्या वाटेने झापडं लावून चालतोय. फक्त इतरांनाच दोष, दूषणं आणि शिव्या देतोय. आता वेळ आलीए ही झापडं काढायची. मी ती टराटरा फाडून टाकली आणि मला माझ्या डोक्यावर दिसला स्वप्नांचा पांढराशुभ्र ढग!
मी त्याला विचारलं, तू केव्हापासून आहेस इथे? तर तो म्हणाला, जेव्हा तू झापडं लावून मला दाबून ठेवलं होतंस ना मनाच्या कप्प्यात तेव्हा मी ढग झालो आणि आलो इथे...
किती दिवसांपासून मी तुला खुणावतोय पण तू झापडं लावून बसलेला. मी किती हसलो तुला. पण मला माहिती होतं की तू येशीलच माझ्यामागे ते! तसंच झालं. किती दिवस तू त्याच त्याच क्षणांच्या चिंध्यापासून सुंदर कोलाज तयार करण्याचा प्रयत्न करत होतास आणि मी तुझी वाट पाहत तंरगतोय इथे बाटलीतला राक्षस कसा वाट पाहतो मालकाची तसा. (‘’जस्ट फॉलो युवर ड्रीम!’’ हे वाक्य हा ढगच तर नाही ना बोलला मित्राच्या तोंडातून!) चल आता खेळ सुरू, तो म्हणाला.
कुठला?, मला काहीच कळेना. तो- पकडापकडीचा. तू माझ्यामागे धावायचं मला पकडण्यासाठी...
पण कुठवर? माझा प्रश्न.
तिथवर. त्या वाळवंटापर्यंत... दूरवर चमकणाऱ्या वाळूच्या टेकड्यांकडे बोट दाखवत तो म्हणाला. आपण तिथे पोहोचलो की तू मला पकडू शकशील. वाटेत मी तुला नवे प्रदेश, पक्षी आणि प्राणी असं काय काय दाखवीनच. त्याचा तू उपभोग घ्यायचा. आणि त्या वाळवंटात पोहोचलो की मी मुक्त! तुझा हात लागला की माझा पाऊस होईल आणि वाळवंटाचं हिरवंगार नंदनवन!
माझा चेहरा उजळला खरा परंतु एक प्रश्न मनातून घरंगळत ओठांवर आलाच, त्यानंतर काय?
तो हसला, त्यानंतर? दुसरा ढग! मीही हसलो मनमोकळं.
... तुमच्या डोक्यावर आहे का स्वप्नांचा ढग? झापडं काढा एक वाळवंट तुमची वाट पाहतंय!
- प्रणव