विशाल लॉजच्या रूम नंबर २०३ मध्ये दुपारी मीना जेव्हा बेडवरून उठून स्वत:ला कपड्यात झाकू लागली तेव्हा उघडाबंब नंदन खिडकीतून बाहेर पाहात कोणत्यातरी स्वस्त सिगारेटचे झुरके मारण्यात गढलेला होता. मीनाच्या डोळ्यात एकाचवेळी लज्जा, अनुभवलेल्या सुखाची झाक अन काय करून बसलो ही पश्चात्तापाची भावना विलसत होती. ती आवरत असतानाच अचानक खोलीचे दार वाजले. नंदन ते उघडायला गेल्यावर ती बाथरूममध्ये गेली. आतून तिला काही संवाद अस्पष्ट ऐकू येत होते. पाच एक मिनिटांनी ती बाहेर आली तेव्हा नंदन शूज घालत होता. संपूर्ण खोली धुराने भरून गेली होती. एका कोपयात एक कधीच न चालणारा फोन! खोलीच्या एका भिंतीवर एक आरसा, दोन घाणेरड्या खुर्च्या, एक तितकेच घाण टी पॉय! टी पॉयवर नंदनने आणलेली एक स्वस्त व्हिस्कीची निप, ज्याची चव घेण्याचा आग्रह केल्याने मीनाने आज पहिल्यांदाच अर्धा पेग घेतला होता. आता तिला ती बाटली बघून जरा किळसच आली. ती चव तिला अजिबात आवडलेली नव्हती. पण त्यामुळेच थोडेसे धाडसी होणे शक्य झाले हेही तिला समजले होते. आपले वडील रात्रंदिवस प्यायचे अन अति पिण्यामुळे त्यांचा झालेला मृत्यू या दोन्ही गोष्टी तिला आठवल्या. तेवढ्यात नंदनने तिच्याकडे पाहिले. दोघांनीही स्मितहास्य केले. नंदनने तिला पुन्हा मिठीत घेऊन तो तिच्यावर चुंबनांचा वर्षाव करू लागला. कसेतरी सुटत तिने त्याला लाडीकपणे दूर ढकलले अन म्हणाली:
मीना - चला आता, तीन वाजले
नंदन - साडे तीन पर्यंत रूम आहे आपल्या हातात! ये इकडे...
मीना ’छे’ म्हणून पटकन दूर झाली. नंदनही आता पूर्ण समाधानी असल्यामुळे फारसा आग्रही नव्हता. तरी तिच्याशी झोंबाझोंबी करतच त्याने रूमचा दरवाजा उघडला अन बाहेर थांबलेल्या वेटरला बाराशे रुपये मोजून दिले. ते दोघे लॉजच्या बाहेर येऊन नंदनच्या जुनाट फियाटमध्ये बसले.
मीना - एवढे घेतले?
नंदन - काय?
मीना - बाराशे
नंदन - मग?
मीना - खाली रिसेप्शनमध्ये रेटस लिहिले आहेत ते तर दोनशे, तीनशे असेच आहेत की...
नंदन - (डोळे मिचकावून) पुढच्या तीन दिवसांचा ऎड्व्हान्स दिलाय...
मीना - हट... म्हणे तीन दिवस! मी आता येणारच नाहीये... आज कशी काय चुकले काय जाणे...
यावर नंदन खट्याळपणे तर मीना किंचित निराश होत व किंचित सुखावत हसली.
मीना घरी आली तेव्हा आई दुपारचा चहा टाकत होती.
आई - काय गं? इतक्या लवकर? झाला का इंटरव्हिव्ह?
मीना - झाला. उद्या बोलावलय पुन्हा शेवटचा इंटरव्हिव्ह म्हणून म्हणे....
आई - ही नोकरी लागली तर बरे दिवस येतील.. मग स्थळे बघायला हरकत नाही.
मीना - मी लग्न करणार नाहीये इतक्यात आई... तुला चांगली आनंदात पाहून मग बघू पुढे माझे..
आई - बरीच मोठ्ठी झालीस की?
यानंतर दोघीही हसल्या. आईच्या नजरेपासून मीनाच्या चेहयावरचे भाव काही लपत नव्हते.
आई - मीना... बरंय ना सगळं?
मीना - म्हणजे?
आई - नाही... अस्वस्थ वाटलीस...
मीना - छे! ऊन काय आहे बाहेर...
मीना लवंडल्यावर आई देवळात निघून गेली. नंदन हा पलीकडच्या गल्लीत राहणारा, मीनापेक्षा दोन, तीन वर्षांनी मोठा असलेला, म्हणजे साधारण चोवीस एक वर्षांचा मुलगा! एरवी गल्लीत आला तर कधी मान वर करून मीनाने बघितलेही नसते. पण दोन महिन्यांपुर्वी तो घरी आला अन चक्क मीनासमोरच आईला म्हणाला की मीनाचा नर्सिंगचा कोर्स झाला की एका चांगल्या हॉस्पीटलमध्ये माझी ओळख आहे तेथे मीनाला नोकरी मिळवून देण्याचा मी प्रयत्न करेन. आता हा कुणाचा कोण अन घरात येऊन असे म्हणतो हे आईला कळेना. पण मीनाचेच भवितव्य उजळणार म्हंटल्यावर तिनेही त्याला व्यवस्थित वागणूक दिली. मीनाही त्याच्याशी नीट वागली. त्यानंतर तो कधीच घरी आला नाही. मात्र त्याने तिला दुसया दिवशी बायोडेटा घेऊन एका नगरसेवकाच्या ऒफिसवर बोलावले होते. तेथे ती पोचली तेव्हा नंदनने तिची ओळख नगरसेवकाशी करून दिली व बायोडेटा ठेवून घेतला. त्यानंतर तो तिच्याशी अर्धा तास गप्पा मारत होता. त्याने सांगीतले की नगरसेवकांच्या विचारप्रणालीने प्रोत्साहीत होऊन तोही समाजकार्यात पडणार आहे. अनेकांना लहानसहान नोकया मिळवून देण्यात, रक्तदान शिबिर वगैरे भरवण्यात आपला हात असल्याचे त्याने तिला सांगीतले. तसेच. याच कार्यात तूही काही सहभाग देणे हे सामाजिक जबाबदारी पार पाडण्यासारखे आहे असेही तो म्हणाला. मीनाही प्रभावित झाली होती. तिने ते आईला सांगीतल्यावर आईने चक्क होकार दिला. मग मीना कोर्स झाल्यावर दोन तास रोज नंदनबरोबर काढायची. कधी तो तिला कॉर्पोरेशनमध्ये तर कधी एखाद्या वृद्धाश्रमात घेऊन जायचा. त्याची वक्तृत्वशैली व ओळखी पाहून मीनावर प्रभाव पडायचा. हळूहळू त्यांच्यात वैयक्तीक स्वरुपाची मैत्री निर्माण झाली. तिला यायला उशीर झाला तर त्याने चिडणे, हा हा रंग तुला चांगला दिसतो म्हणणे, आईने केलेले पदार्थ तिने त्याच्यासाठी आणणे असे प्रकार केवळ पंधराच दिवसात सुरू झाले. अन मग एक दिवस तोही प्रसंग आला. नंदन तिला पंचवीस एक किलोमीटर लांब असलेल्या एका छोट्या गावात बसमधून घेऊन गेला. तेथे काही समाजकार्य केल्यासारखे करून मग परतीच्या प्रवासात त्याने तिला सहेतूक स्पर्श केले. तिनेही मूक दाद दिली. मग एकमेकांच्यात निर्माण झालेले अबोल नाते एक दिवस नंदनने बोलके करून टाकले. त्याने सरळ सांगीतले की तिला नोकरी लागल्यावर तो तिच्याशी लग्न करायला तयार आहे. आता छुपे असे काही राहिलेच नव्हते. मीनाने किचित भाव खाल्ल्यासारखे दाखवत तो प्रस्ताव शेवटी स्वीकारला. आईला मात्र काही सांगीतले नाही. ती कधी त्याच्या घरीही गेली नाही. मात्र त्याच्या घरचे तिला थोडेफार माहीत होते.
या प्रसंगानंतर फियाटमध्ये हातात हात घेणे, डोळ्यात डोळे मिसळून स्वप्नील नजरेने बघणे, कधीतरी हळूच चोरटे चुंबन घेणे या पातळ्यांना मीना सरावली. शेवटी एक दिवस अनावर होऊन नंदनने तिला सांगीतले की उद्या तुझा इंटरव्हिव्ह आहे अन त्याची भेट मला आजच पाहिजे. त्याला हवी असलेली भेट काय आहे याचा सुगावा लागल्यावर मीनाने सौम्य शब्दच वापरले पण कडकडून विरोध केला. पण त्याने मग त्याचे वक्तृत्वकौशल्य वापरले. तुला नोकरी तर मिळणारच आहे. पण आता मला तुझ्याकडून काही नको असे उद्गार रुसल्याप्रमाणे काढून त्याने अबोला धरला. सकाळचे अकरा वाजले तसे त्याने फियाट तिच्या गल्लीकडे न्यायला सुरुवात केली. तो अबोलच होता. शेवटी मीनाने विचार केला, नाहीतरी लग्न याच्याशीच करायचे आहे. आपल्या नोकरिसाठी हा किती झटतो आहे. गावागावात फिरून किती लोकांना मदत करतो आहे. शेवटी अब्रू जपायची ती अशा चांगल्या माणसाचे होण्यासाठीच ना? तसेच एकदाच तर जायचे आहे, पुन्हा नाही म्हणता येईलच. ती गप्प बसलेली पाहून त्याने विषय पुन्हा काढला. मग तिने खूप आढेवेढे घेत व इतर अनेक पर्याय सुचवत शेवटी त्याचा विशाल लॉजचा पर्याय मान्य केला. बूथवरून आपल्या घरासमोरच्या वाण्याकडे फोन करून आईसाठी ’आज इंटरव्हिव्ह आहे, उशीर होईल’ असा निरोप ठेवला.
लॉजवर पोचले तेव्हा मीनाचा चेहरा काळाठिक्कर पडलेला होता. रिसेप्शनीस्ट, हॉटेलबॉय असे दोघे तिघे तिच्याकडे निरखून बघत होते. ती कशी तरी मान खाली घालून रूमवर पोचली. आतून दार लावल्यावर मात्र तिला वेगळाच नंदन बघायला मिळाला. वासनेने पुरा पेटलेला नंदन! त्यात आणखीन त्याने ती बाटली खिशातून काढली. नको नको म्हणतानाही आग्रहाने तिला अर्धा पेग पाजला. एकंदर वातावरण फारच हलके हलके वाटायला लागले तेव्हा तीही नंदनच्या स्पर्शांनी घायाळ होऊ लागली. शेवटी कोणत्यातरी बेसावध क्षणी तिने सर्वस्व नंदनला अर्पण केले.
पलंगावर पडून मीना हे सगळे आठवत होती. उद्या सकाळी आपला इंटरव्हिव्ह होईल अन एकदाचा पगार सुरू होईल. बाबा गेल्यापासून एकंदर यथातथाच चालले होते. आई काहीतरी किरकोळ कामे करायची अन मीना रात्री तीन तास एका फोन बूथवर कामाला जायची. आता घराची अवकळा जाणार होती. त्याच विचारात असताना तिला नंदनचे स्पर्श आठवायला लागले. संपूर्ण अंगातून जणू सुखाच्या लहरी फिरल्या. लग्नाआधी आपण हे केले याचा पश्चात्ताप हळूहळू विरळ होत त्यातील सुख मनावर व्यापत होते. ती संध्याकाळ सुखात घालवून मीना रात्री झोपून गेली.
दुसया दिवशी नेहमीपेक्षा जरा जास्तच नीट आवरून मीना हॉस्पीटलवर पोचली तेव्हा नंदन तिचीच वाट पाहात होता. आज तिला पाहून तर तो घायाळच झाला. तिलाही ते जाणवले तशी ती सुखावली.
नंदन - काय दिसतीयस तू...
मीना - (खट्याळपणे) काय दिसतीय? चांगली नाहीये दिसत?
नंदन - कलेजा खल्लास.... आज पण नेणार तुला तिथे..
मीना - (डोळे वटारून) आला लाडात.... पुन्हा तो विषय काढायचा नाही...
नंदन - आज नेमके इंटरव्हिव्ह घेणाया अधिकायांना गावाला जावे लागले. तीन दिवसांनी येणार...
मीना - मग? म्हणजे आज नाही होणार इंटरव्हिव्ह?
नंदन - नाही ना... मी हेही म्हणालो की सगळे कसे तीन दिवसांनी पुन्हा येतील?
मीना - म्हणजे आणखीन पण मुली आहेत इंटरव्हिव्ह द्यायला?
नंदन - सोळा जणी आहेत.. पण सिलेक्ट तूच होणार..
मीना - कुठेयत बाकीच्या मुली? ( तिथे कुणीच दिसत नव्हते)
नंदन - सगळ्या इकडे तिकडे विखुरल्या इंटरव्हिव्ह नाही म्हंटल्यावर...
मीना निराश झाली. तिने घरी जायचा निर्णय घेतल्यावर नंदन तिला सोडायला निघाला. पुन्हा गाडीत त्याने लॉजवर चलण्याचा विषय काढून पाहिला पण आज मीनाने चांगलाच विरोध केला म्हंटल्यावर त्यानेही ताणून धरले नाही. अर्थात, मीनाही रागवलेली नव्हतीच तर केवळ सावधान होती.
दोन दिवस गेले. दोन दिवसात मीनाला नंदन एकदाच घाईघाईत भेटला होता. तिसया दिवशी पुन्हा हॉस्पीटलला भेटण्याचे ठरले. मीना त्याही दिवशी तिथे पोचली. मात्र नंदन तेथे नव्हता. मीनाने चौकशी केल्यावर इंटरव्हिव्ह पहिल्या मजल्यावर आहेत असे समजले. तिथे गेली तर नंदन अगदी खासगीत एका माणसाशी बोलत होता. मीनाला पाहताच त्याने झटकन तिला तेथे बोलावले व त्या माणसास सांगीतले की याच त्या मॅडम! त्यावर त्या माणसाने मान डोलावली व नंदनने तिला बसायला सांगीतले.
नंदन - आज फक्त तुझाच इंटरव्हिव्ह आहे. माझे बोलणे झालेले आहे. स्टार्ट तेवीसशे आहे. मला जरा जायला हवे. तू बैस, बोलावले की आत जा.
मीना - तुम्ही का थांबत नाही आहात?
नंदन - मला कॉर्पोरेशनला गेलेच पाहिजे, आज सभा आहे.
मीना - काम होईल ना माझे नक्की?
नंदन - होईल? काम झालेलेच आहे... फक्त नाटक उरलंय इंटरव्हिव्हचे!
असे बोलून तिचा हात दाबून नंदन निघून गेला. तब्बल पाऊण तासाने तिला आत बोलावले. कुणीतरी तिला अनेक प्रश्न विचारले. तिने बहुतेक सगळी उत्तरे बरोबर दिली. ’कळवू तुम्हाला आम्ही’ असे तो माणूस म्हणाल्यावर मीना घरी निघून आली. पुन्हा आईने चौकशी केल्यावर तिने सांगीतले की आज फायनल इंटरव्हिव्ह झाला अन नंदन आहेतच पुढचे बघायला.
तोही दिवस गेला अन त्यापुढचे दोन दिवसही नंदनला न भेटताच गेले. तो सारखा कुठे ना कुठे बिझी होता.
शेवटी मीनाची अन त्याची भेट झाली. नंदनने काय म्हणावे? तो म्हणाला तुझे अपॉंइंटमेंट लेटर माझ्याकडे आहे पण तू आज विशाल लॉजला यायला हवेस. ती लाडीक फणकायाने नाही म्हणाली. पण ती प्रचंड हुरळून गेली होती. एक तर हातात जॉब, त्यात पुन्हा नंदन आज तेच सुख देणार! खूप आढेवेढे घेऊन शेवटी दोघे पुन्हा लॉजवर आले.
प्रेमाचा पहिला वर्षाव झाल्यानंतर हळूच मीनाने लेटरबद्दल विचारले. नंदनने चक्क तिला त्याच हॉस्पीटलचे लेटर दाखवले. मात्र तो म्हणाला की हे लेटर अजून नगरसेवकसाहेबांना दाखवायचे आहे. मगच तुला देणार. तिने वाचले तर त्यावर सव्वीसशे पगार होता. आता तर आनंदाला पारावारच राहिला नाही. आईला किती आनंद होईल याचा तिला विचारच करता येत नव्हता. आता नंदनवर प्रेम करण्यात तिने स्वत:हून पुढाकार घेतला.
दोघेही बेडवर समाधानाने पडलेले असताना मीनाने लग्नाबाबत विचारले. नंदन झटक्यात उठून बसला.
नंदन - मीना.. मला काही समजत नाही...
मीना - काय झाले?
नंदन - घरातल्यांनी मुलगी पसंतही करून ठेवली माझ्या नकळत काल...
मीना - काय? (मीनाला प्रचंड धक्का बसलेला होता. आता तीही ताडकन उठून बसली)
नंदन - माझी भांडणे चाललेली आहेत कालपासून घरात...
मीना - अहो पण.... हा प्रश्नच कुठे येतो?
नंदन - कसला?
मीना - अहो आपले ठरलेय म्हंटल्यावर तुम्ही घरी सांगून टाका ना आता?
नंदन - मी सांगीतले नसेन का मीना?
मीना - मग?
नंदन - पण शब्द दिला म्हणतायत...
मीना - शब्द? मला नाही का दिलात तुम्ही शब्द?
नंदन - अर्थातच मीना... मी असा मागे फिरणारा नाही... वेळ पडली तर सरळ तुझ्याशी कोर्टात लग्न लावेन मी...
मीना - पण हे तुम्ही बोललाच नाहीत मला सकाळपासून...
नंदन - तुझ्या नोकरीच्या आनंदात विसरून गेलो...
मीना - आयुष्याचा प्रश्न आहे हा... नोकरी काय...?
नंदन - म्हणजे मी इतके प्रयत्न करून तुला नोकरी लावून दिली त्याचे काही वाटत नाही ना तुला?
मीना - नंदन काय बोलताय? आपले लग्न करायचे ठरलेले आहे ना?
नंदन - मी आजच सोक्षमोक्ष लावून टाकतो घरात....
मीना - अन ते नाहीच म्हंटले तर?
नंदन - मला त्यांच्या नकाराची काळजी नाही गं वाटत... मला काळजी वेगळीच आहे...
मीना - कसली?
नंदन - आईला हार्टचा त्रास आहे. कालच भांडणे झाल्यावर तिला दवाखान्यात न्यायला लागले...
मीना - मग? आता बरे आहे का?
नंदन - हो पण... पुन्हा भांडणे झाली अन तिचे काही झाले तर....?
मीना - अहो पण... म्हणजे बरोबर आहे... पण आपले हे बोलायला तर हवेच ना?
नंदन - मीना.... मी आज हा विषय संपवतो म्हणजे संपवतो.
मीना - शांतपणे बोला हां! आईंन त्रास होऊ देऊ नका....
या वाक्यावर नंदनने पुन्हा तिला आपल्या बाहुपाशात घेतले. पण आता मीनाचा तो मूडच नव्हता. झटकन तयार होऊन दोघे निघताना नंदन म्हणाला:
नंदन - मीना... हे तुझे लेटर...
मीना - उद्या देणार होतात ना?
नंदन - भाऊसाहेबांना दाखवायचे होते... पण मला आज उशीर होणारे... तूच नेऊन दाखवशील का?
मीना - मी?
नंदन - आता त्यांच्यामुळेच नोकरी लागली म्हंटल्यावर तुला जायला नको का भेटायला?
मीना - म्हणजे... जाईन मी... पण आपण दोघेही गेलो असतो तर?
नंदन - आता मला होणार आहे उशीर अन त्यात पुन्हा मला आज घरी आपला विषय काढायचाय...
मीन - ठीक आहे... जाऊन येईन मी.. नंतर माझ्याकडेच ठेवायचे ना लेटर?
नंदन - म्हणजे काय? तुझेच आहे... पुढच्या आठवड्यात जॉईनही व्हायचेस तू...
मीना - किती वाजता जाऊ भाऊंकडे?
नंदन - साडे आठला त्यांच्या घरीच जा...
मीना - घरी? का? ऒफिसला जाते की?
नंदन - नाही.. आज आमदार येणारेत. त्यांची फ्लाईट सातची आहे. भाऊ साडे आठला डायरेक्ट घरीच पोचतील...
मीना - मला ओळखतील का?
नंदन - मी फोन करून ठेवतो ना... अन त्या दिवशी पाहिलेले नाहीये का?
मीना - ठीक आहे. तुम्ही घरी प्लीज बोला हां आज?
नंदन - मीना, हा आपल्या जीवन मरणाचा प्रश्न आहे... मी बोलणार नाही का?
या वाक्यानंतर दोघांनीही एकमेकांना जवळ घेतले व काही क्षणांनी लॉजच्या बाहेर पडले.
मीनाचे लेटर बघून आई अक्षरश: धन्य झाली. तिने देवापुढे गोड ठेवले व शेजारीपाजारीही साखर वाटली. सगळ्यांनी येऊन मीनाचे कौतूक केले. अनेक बायकांच्या मते आता मीनाने जन्मदात्रीचे ऋण फेडले होते. मीनाच्या आईने मीनाला जवळ घेतले तेव्हा दोघी हमसाहमशी रडल्या. दु:ख संपले तरी रडू येते म्हणायचे!
भाऊंसारख्या मोठ्या माणसाला भेटायचे म्हणजे वेळेवरही जायला हवे अन दुसरे कोणीतरी बरोबर असलेले बरे... या विचाराने मीनाने मैत्रिणिला विचारले. पण तिला शक्य नव्हते. मग मीना एकटीच निघाली.
भाऊंच्या ऒफीसपासून दोनच मिनिटांवर त्यांचे घर होते. बंगलाच होता तो. भाऊंची फॅमिली नव्हती. समाजकार्यात झोकून देणायाला स्वत:कडे बघायला वेळच झाला नव्हता. एक भला दांडगा कुत्रा गेटच्या आत स्वागतास भुंकून बंगला डोक्यावर घेत होता.
तो अजस्त्र कुत्रा बघून मीना घाबरली. मात्र तेवढ्यात एक नोकर आला व त्याने कुत्र्याला मागे नेऊन बांधले. मग त्याने गेट उघडल्यावर मीना आत गेली. मीनाला व्हरांड्यात बसवून तो साहेबांना वर्दी द्यायला आत गेला. अंधारलेला व्हरांडा, एक अंधुक प्रकाशाचा बल्ब, खालील मजल्यांवर बराचसा अंधार, वरच्या एका खोलीतच जरासा उजेड! एकंदर बंगल्याचे दर्शन मीनाला सुखावह वाटले नाही. तेवढ्यात नोकराने येऊन तिला वर जायला सांगीतले व जिन्यापासचा लाईट लावला. घर मात्र उंची वस्तूंनी नटलेले होते. मीनाने दबकत दबकत व मागे नोकराकडे पाहात हळूहळू जिना चढायला सुरुवात केली. नोकराने तिला ’निश्चींतपणे जा’ अशा स्वरुपाचा हात हलवून किंचित निर्धास्त करण्याचा प्रयत्न केला.
जिना चढून झाल्यावर ज्या खोलीत लाईट होता त्या खोलीच्या दारात मीना उभी राहिली. दार उघडेच होते. आतमध्ये भाऊ बसलेले तिला दिसले. ते टी. व्ही. बघत होते व स्वत:च खुसखुसत होते. त्यांच्या गुबगुबीत सोफ्यावर ते आरामात लवंडलेले होते. त्यांच्या अंगावर नाईट सुट होता. शेजारच्या टीपॉयवर मद्याचा इतजाम होता. त्यांची नजर तिच्याकडे वळताच ते ताडकन उठून बसले.
भाऊ - अरे अरे अरे अरे? मीना का? ये ये ये... नंदन म्हणाला तू येणार म्हणून ( भाऊ हसत होते. )
मीना जराशी कंफर्टेबल झाली व आत गेली. भाऊ हसून बोलतात बघून तिला जरा बरे वाटले. पण ते मद्यपेले पाहून तिला ’यांना नशा वगैरे तर झालेली नसेल ना’ असे मनात आले. पण आता पर्याय नव्हता. दोन मिनिटांत काम उरकून येथून सटकायचेच आहे असे तिने स्वत:ला बजावले.
मीना - सर... थॅक्यू सर.. मला मिळाले लेटर...
भाऊ - अरे म्हणजे काय? तुझ्यासारख्या गोड पोरीला आम्ही देणारच की लेटर? हा हा हा...
मीना - सर.. नंदन म्हणाले की हे लेटर तुम्हाला दाखवायचे...
भाऊ - अरे आम्हाला कशाला दाखवायला हवे? ऎ? हा हा! ते तर आम्हीच बनवलेले आहे ना? (भाऊ हसत होते. )
मीना - सर आईलापण खूप आनंद झाला. तुमच्या आशीर्वादाने आमचे दिवस पालटले...
भाऊ - गूड... व्हेरी व्हेरी गूड.. (असे म्हणून भाऊंनी व्हिस्कीचा एक मोठा घोट घेतला. )
मीना - सर.. हे पेढे...
भाऊ - पेढे? पेढे कशाला?
मीना - सर गुड न्यूज आहे...
भाऊ - वा वा! बस बस... इथे बस? (भाऊंनी आपल्या शेजारी हात आपटून तिला सांगीतले. )
मात्र मीना समोरच्या खुर्चीत बसली.
भाऊ - काय दिवस आलेत हल्ली... काय काय दाखवतात टी. व्ही वर... काय हल्लीच्या मुली...
मीना - काय झाले सर? (तिला आपले काही चुकले की काय असे वाटले. )
भाऊ - आत्ताच मी बघितले... कोणीतरी मुलगी चक्क हॉटेलात धंदा करते...
मीना एकदम शरमली. तिने निघण्यासाठी चुळबुळ सुरू केली.
मीना - सर.. मी निघू?
भाऊ - अगं बस? हे बघ.. हीच ती मुलगी...
टी. व्ही वरचे दृष्य पाहून अर्थातच मीनाला घेरी यायची तेवढी राहिली होती.
विशाल लॉजमध्ये एकमेकांच्या बाहूपाशात विसावलेले नंदन अन मीना टी. व्ही वर होते.
मीनाने आपले डोके हातात धरले व ती शॉक लागल्यासारखी तिकडे बघू लागली. ती लाईव्ह सी. डी. होती. तिने अत्यंत विश्वासाने नंदनच्या हाती सोपवलेली तिची अब्रू आता घराघरात पोचायला वेळ लागणार नव्हता. मीनाच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता. अश्रूंच्या सरी तिच्या सताड उघड्या डोळ्यांमधून ओघळत होत्या. तिला ती दृष्य बघून जेव्हा भान आले व किळस वाटली तेव्हा तिने भयातिरेकाने भाऊंकडे पाहिले तर ते तिच्याचकडे मिष्कीलपणे पाहात होते.
भाऊ - तू अशी मुलगी आहेस हे माहिती नव्हते... नाहीतर आम्ही ती नोकरी एखाद्या गरजू मुलीला नसती का दिली?
मीना - सर.. तुम्ही... तुम्ही...
भाऊ - काय तुम्ही तुम्ही? दे ते लेटर इकडे.. (असे म्हणून भाऊंनी ते लेटर ओढून ते फाडून फेकून दिले. )
मीना ओक्साबोक्शी रडू लागली. भाऊ उठले. तिच्याजवळ येऊन त्यांनी आपला एक हात तिच्या खांद्यावर ठेवला. त्याबरोबर ती ताडकन उभी राहिली.
मीना - नालायक... तुझे बिंग फोडणार आहे मी.. नंदन तुला काय समजतात अन तू काय आहेस...
भाऊ - नंदन? तो काय समजणार मला? त्यानेच तर आणून दिली ही सी. डी माझ्याकडे...
मीनाच चेहरा पांढराफटक पडला. ती उद्ध्वस्त झाल्याप्रमाणे भाऊंकडे बघत राहिली. भाऊंनी संधी साधून तिला आवळले. मीनाला भान येईपर्यंत ती त्यांच्या सोफ्यावर आडवी झालेली होती. मात्र त्यानंतर तिने भानावर येऊन त्वेषाने त्यांना लाथ मारली व स्वत: उठून दरवाजाकडे धावली. भाऊंनी वाटेतच तिला धरले.
भाऊ - साली धंदेवाली... त्या फाटक्या नंद्याबरोबर झोपते.. नगरसेवक आहे मी... बरबाद होशील तू...
भाऊ बोलत बोलत तिला ओढू लागले. मीनाला हा प्रसंग अजिबात कल्पनेत नसल्याने ती असहाय्य होऊन नोकराला हाका मारू लागली. तर तो त्या कुत्र्याला घेऊन खोलीच्या दारापाशी आला. कुत्रा कधी एकदा मीनाच्या अंगावर झेपावता येतेय अशा आवेशात भुंकू लागला. मीनाची शेवटची संधी नष्ट झाली. नोकराने खोलीचे दार बाहेरून बंद केले. तब्बल पाउण तास भाऊंचे अत्याचार सहन केल्यावर तिची सुटका झाली. भाऊ हसत हसत बोलू लागले.
भाऊ - पायरी ओळखून वागत जा.. ये म्हंटलं की यायचं! नाटकं चालणार नाहीत.. नाहीतर ही सी. डी. घराघरात पोहोचेल...
मीना बेडवरच अस्ताव्यस्त पडलेली होती. तिच्या चेहयावरची सुतकी कळा पत्थराला पाझर फोडणारी होती.
बयाच वेळाने मीना कशीबशी उठली. सगळ्या स्वप्नांचा चक्काचूर झालेला होता. नाही नोकरी, नाही लग्न, नाही अब्रू राहिली. हे दुर्दैव आपल्यावर का ओढवावे हेच तिला समजत नव्हते. मनातल्या मनातच आक्रंदत तिने मनाशी ठरवले. या रॅकेटचा पर्दाफाश करून प्रत्येकाला नेस्तनाबूत करायचे. मीनाचा सूडाचा प्रवास या समाजाला शुद्ध करणार होता खरा... पण त्यात तिचा स्वत:च बळी गेल्यावरच!
त्या खोलीतून बाहेर पडताना भाऊंनी पाचशे रुपये तिच्या हातात कोंबले. तिला ते घ्यायचे नव्हतेच. पण आत्ता असल्या गोष्टींवर विचार करण्याची तिची मानसिकताच उरली नव्हती. ती पेटली होती सुडाच्या आगीने!
खाली उतरताना नोकराने तिला दारापर्यंत एस्कॉर्ट केले. यावेळेस कुत्रा पुन्हा बांधलेला असावा. पण त्याची तिला आठवणच नव्हती. नोकर निर्लज्जासारखा हसत होता.. पण त्याकडेही तिचे दुर्लक्षच होते. रात्रीचे दहा वाजत आले होते. यावेळेस आईला काय उत्तरे द्यायची इतकाच विचार ती करत होती. घामेजलेल्या हातातील पाचशेच्या नोटा बघताना तिला एक उपाय सुचला. ती नोकराकडे वळत म्हणाली:
मीना - ही घ्या भाऊ शंभराची एक नोट तुम्हाला...
नोकर - मला? (मात्र त्याने ती नोट हातात घेतली खरी)
मीना - मग? बहिणीला अब्रू विकायला लावणाया भावाला त्यात भाग नको का द्यायला?
हे वाक्य बोलण्यात मीनाचा हेतू वेगळाच होता. तिला तपासायचे होते त्याच्या चेहयावरचे भाव! आणि नेमके तिला अपेक्षित तेच भाव त्याच्या चेहयावर दिसले. क्षणभरासाठी त्याच्या डोळ्यांमध्ये माणूसकीची झलक तरळल्याचे तिला स्पष्ट जाणवले. मात्र तो इतक्यात बदलणे शक्यच नव्हते. त्याने ताबडतोब स्वत:च्या मनातील विचार दूर सारत ती नोट पुन्हा तिच्या हातात कोंबत म्हणाला:
नोकर - ए बाई.. लई जीभ चालवू नको.. खाडकन कानाखाली देईल एक... मला भडवा समजतेस काय?
मीना - छे हो.. काहीतरी काय? तुम्ही तर फक्त कुत्रा वर आणून दार लावून घेतलेत... तुमचा काय दोष आहे...!
असे म्हणून ती ताडताड चालत गेटमधून निघाली. स्त्रियांना पाठीकडेही डोळे असतात असे म्हणतात. तिला ’गेट लावण्याचा आवाज किती क्षणांनी येतो’ हे तपासायचे होते. कारण त्यावरून तो नोकर तिच्या बोलण्यावर किती विचार करत होता याचा अंदाज आला असता. याहीवेळेस तिचा अंदाज खरा ठरला. तब्बल पंधरा सोळा पावले चालल्यानंतर तिला गेट लावण्याचा आवाज आला. मागे न बघताही नोकरात पडलेला फरक तिला कळला होता.
वीस एक मिनिटे ताडताड चालत मीना घरी पोचली तेव्हा ती आमुलाग्र बदललेली होती. तिच्या चेहयावर बलात्काराच्या अपमानाचा लवलेषही नव्हता. मात्र केस विस्कटलेले, कपडे चुरगळलेले ही अवस्था पाहून दारात काळजीने उभी असलेली आई आणखीनच घाबरली.
आई - काय गं? काय ही अवस्था तुझी? कुठे होतीस इतका वेळ?
मीना पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली होती. तिने मनात ठरवले. आईला खोटे सांगून हातात काहीच पडणार नव्हते. या वयात तिला धक्का बसेल हे खरे, पण त्यानंतर निदान ती तरी साथ द्यायला आपल्या जवळ असेल. तसेही, आईचे हृदय आहे म्हंटल्यावर अशा गोष्टी चेहयावरून ओळखण्यात तिला फारशी अडचण येणार नाहीच. कधी ना कधी तरी ती खोदून विचारेलच! नोकरीलाही जाता येणार नाही म्हंटल्यावर का जात नाहीस असे विचारेल तेव्हा काय सांगणार? मीनाने स्पष्ट बोलायचे ठरवले.
मीना - तुझी मुलगी एका राक्षसाला भेटून आलीय आई... भाऊंनी जबरदस्ती केली माझ्यावर...
हे ऐकून आई हादरली. ती दार लावून आत येऊन ओक्साबोक्शी रडायला लागली. मीनाच्या डोळ्यातून अश्रूंच्या सरी ओघळायला लागल्या. मात्र कशी कोण जाणे ती थिजल्यासारखी किंवा निश्चय केल्यासारखी एकाच जागी उभी होती. ती ओलावल्या स्वरात म्हणाली:
मीना - रडून उपयोग नाही आई! झाले ते झाले. बाबा असते अन चांगले वागत असते तर आपल्यावर ही वेळ आलीच नसती. पण आता आलीच आहे तर तिचा सामना केला पाहिजे. मी या सगळ्या प्रकाराचा सूड घेणार आहे. मला तुझ्याकडून रडण्याची अन सांभाळण्याची अपेक्षा नाही आई, मला तुझ्याकडून अपेक्षा आहे ती मला शक्ती देण्याची! तुझ्या पश्चातही मला सन्मानाने जगण्यासाठी शक्ती लागणारच की? रडू नकोस!
हे बोलेपर्यंत हमसाहमशी रडणारी आई तिच्याजवळ आली अन तिने मीनाच्या पाठीवर हात ठेवला. मग मात्र मीनाचा धीर सुटला. आईच्या स्पर्शाने लाभलेल्या उबदार सुरक्षेमुळे मीना भेसूर रडायला लागली. आई वडिलांच्या फोटोकडे पाहून म्हणाली:
आई - बघा कसा संसाराचा सत्यानाश केलात... स्वत: प्यायचात, नोकरी नाही की काही नाही... मेलात... आता हे दिवस बघतीय...
दोघीही रडत होत्या. रात्रभर एकमेकांच्या मिठीत अश्रू ढाळत दोघी जाग्याच होत्या. मीनाने शेवटी नंदनबरोबर लॉजवर गेल्याचेही सांगीतले. मात्र आता आई तिच्यावर रागावली नाही. तिने फक्त तिला थोपटले. एका कळीचे आयुष्य उद्ध्वस्त झालेले होते. मात्र आता ती कळी होणार होती एक जहरी काटा! एक काळी रात्र संपून उजाडू लागले तेव्हा दोघींचाही निर्णय झाला होता.
सोलापूर सेक्स स्कॅंडल नेस्तनाबूत करण्याचा.....
क्रमश:
------------------------------------------------------------------------------------
सोलापूर सेक्स स्कॅंडल ही काल्पनिक कादंबरी असून मी ती सध्या लिहीत आहे. त्यातील पहिला भाग येथे सादर करत आहे. या विषयावरील आपल्या लिखाणावर काय प्रतिक्रिया येतात यावरून पुढे झालेले चार भागांचे लिखाण प्रकाशित करायचे की नाही हे मला ठरवता येईल. या कादंबरीचे अजून बरेचसे भाग लिहून व्हायचेच आहेत. विषयामुळे काही उल्लेख किंचित अस्वीकारार्ह पद्धतीचे वाटू शकतील. मात्र वास्तव जीवनाला स्वीकारावे लागते ही वस्तुस्थिती आहेच. काल्पनिक कथानक असल्यामुळे अर्थातच कुणाला कोणतेही साधर्म्य वगैरे जाणवल्यास तो योगायोग समजावा. हे सेक्स स्कॅंडलची शिकार झालेल्या मीना नावाच्या मुलीचे एक सूडनाट्य आहे.
- 'बेफिकीर'!