जीवन कसे जगावे,पडलाय पेच आहे
तो मागचा शहाणा,पुढच्यास ठेच आहे.
साहत कशा रहाव्या,जखमा जुन्या पुराण्या
दिसते जरी पुराणे,दुखणे नवेच आहे
पूजन कुणां करावे?पुजण्यास कोण आहे ?
सैतान भासते जे, दैवत असेच आहे
वार्धक्य टाळण्याचे, ठाऊक ना कुणाला
मरणे अटळ तरीही,जगणे हवेच आहे
दु:खा पुरुन उरावे,''कैल्या ''स ज्ञात आहे
सारुन हर समस्या,निघणे पुढेच आहे.
डॉ.कैलास गायकवाड